ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
सत्तेचा माज होता, पण जनमत नव्हते; महायुतीचे तिन्ही खांब रायगडमध्ये कोसळले

फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
रायगड : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल हे कोणत्याही एका पक्षाविरोधातले नसून संपूर्ण सत्ताधारी व्यवस्थेवर जनतेने दिलेला सामूहिक आणि ठाम निकाल आहेत. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) हे तिन्ही पक्ष सत्तेत असूनही रायगडमध्ये अपेक्षित निकाल देऊ शकले नाहीत. हा पराभव वेगवेगळा नाही, तर एकत्र सत्तेत राहूनही वेगवेगळ्या दिशेने खेचण्याच्या राजकारणाचा थेट परिणाम आहे.
राज्यात सत्तेसाठी एकत्र उभे राहणारे हे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र कुठे मित्र, कुठे प्रतिस्पर्धी, तर कुठे थेट संघर्ष करताना दिसले. या गोंधळलेल्या भूमिकेला जनतेने स्पष्ट नकार दिला. रायगडमध्ये महायुती युतीसारखी वागलीच नाही आणि मतदारांनी त्याची किंमत थेट निकालातून लावली.

महायुतीत भाजप हा सर्वात मोठा, प्रभावी आणि सत्तेचा केंद्रबिंदू असलेला पक्ष असल्याने रायगडमधील अपयशाची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर येते, हे नाकारता येत नाही. मात्र हा पराभव केवळ भाजपपुरता मर्यादित नाही, हेही तितकेच स्पष्ट आहे. उरण आणि कर्जतमध्ये भाजपचे उमेदवार सपशेल अपयशी ठरले, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला, तर मुरुड जंजिरामध्ये शिंदे गटाला पराभवाचा कडू घोट घ्यावा लागला. या चित्रातून महायुतीचा प्रत्येक खांब एकाच वेळी कमकुवत ठरल्याचे दिसून येते.

दहा नगरपालिकांच्या निकालांकडे पाहिले, तर सत्ताधारी असूनही महायुतीला जिल्ह्यावर ठोस वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही, हे प्रकर्षाने समोर येते. तीन नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), तीन शिवसेना (शिंदे गट), अवघी एक भाजप, तर उर्वरित नगरपालिका शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या वाट्याला गेल्या. सत्ता हातात असूनही प्रभाव कमी पडणे, हीच महायुतीची सर्वात मोठी हार ठरली आहे.

रोह्यातून वनश्री शेडगे, मुरुड जंजिरामधून आराधना दांडेकर आणि कर्जतमधून पुष्पा दगडे यांचा विजय अजित पवार गटासाठी दिलासादायक असला, तरी श्रीवर्धन आणि महाडसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या नाकाखालून सत्ता निसटणे हे राजकीयदृष्ट्या अत्यंत गंभीर संकेत देणारे आहे. सत्ता, पदे आणि प्रशासन हातात असूनही जनतेपर्यंत पोहोच न होणे, हा इशारा सहज दुर्लक्षित करता येणार नाही.
शिंदे गटाने सत्तेत सहभाग घेत “खरी शिवसेना”चा दावा केला असला, तरी मुरुड जंजिरासारख्या ठिकाणी झालेला पराभव वेगळेच वास्तव मांडतो. संघटना जमिनीवर कमजोर असल्याचे, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याचे आणि सत्तेचा लाभ मतांमध्ये रूपांतरित न झाल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे.
दरम्यान, उरणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या भावना घाणेकर यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर विजय मिळवला, तर श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे अतुल चौगुले यांनी राष्ट्रवादीला जबर धक्का दिला. भाजपला फक्त पेण नगरपालिकेवर समाधान मानावे लागले, तर उरण आणि कर्जत मधील पराभव त्यांच्या राजकीय जखमेवर मीठ चोळणारा ठरला.
एकूणच पाहता, तीन वेगवेगळे पक्ष असले तरी चूक एकच ठरली. स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष, कार्यकर्त्यांना गृहीत धरणे आणि “सत्ता म्हणजेच विजय” हा घातक गैरसमज. नगरपालिका निवडणूक प्रचारावर नाही, तर रोजच्या अनुभवावर जिंकली जाते. पाणी, कचरा, रस्ते, कर आणि प्रशासनाचा त्रास येथे निर्णायक ठरतो, आणि रायगडमध्ये हे काम सत्ताधाऱ्यांच्या बाजूने नव्हते.
रायगडचा हा निकाल कुणा एक पक्षाला दिलेला धक्का नसून संपूर्ण सत्ताधारी महायुतीला दिलेला थेट इशारा आहे. आज नगरपालिका निसटल्या आहेत, उद्या हाच रोष महापालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांत उमटला, तर “सत्ता आहे” हा आधार पुरेसा ठरणार नाही. रायगडने ठणकावून सांगितले आहे. एकत्र सत्ता चालते, पण विस्कळीत राजकारण चालत नाही.




