महाराष्ट्रताज्या बातम्यामुंबईरायगड
“खड्डे बुजवा नाही, तर सत्तेला बुजवू” रायगडात शेकापचा आक्रमक इशारा
पेझारी चेक पोस्टवर शेकापचा रस्ता रोको- प्रशासन आले गुडघ्यावर, दिवाळीपूर्वी रस्ते दुरुस्त करण्याचे दिले लेखी आश्वासन, आंदोलन केले तात्पुरते स्थगित

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलिकडे गेली आहे. खड्ड्यांमुळे अपघात, वाहतुकीचा बोजवारा आणि जनतेचा त्रास दिवसेंदिवस वाढत असतानाही सरकार आणि प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे. या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाने पेझारी चेक पोस्टवर जन आंदोलन उभे केले!

प्रशासनाने सुरुवातीला मौन राखले, पण आंदोलन वाढताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले की रस्त्यांची दुरुस्ती दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यात येईल.
या आश्वासनानंतर शेकापने आंदोलन तात्पुरते स्थगित केले, पण स्पष्ट इशारा दिला “खड्डे बुजवले नाहीत, तर पुढचा आंदोलनाचा ज्वालामुखी उफाळेल!”

सकाळी साडे नऊ वाजता सुरू झालेल्या रस्ता रोकोमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नागोठणे आणि अलिबागकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. आंदोलनाच्या ठिकाणी घोषणांचा गजर झाल्याने परिसर दणाणून गेला.

“सरकार प्रशासन झोपले, रस्त्यावर जन आक्रोश!”
शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात कार्यकर्त्यांचा संताप उसळला. रस्त्यांवर खड्डे आणि खड्ड्यांवर आश्वासनांचा मलम. हे सरकारचे खरे चित्र आहे, असा घणाघात चित्रलेखा पाटील आणि एडवोकेट मानसी मात्रे यांनी केला. दिवाळीपूर्वी काम सुरू न झाल्यास आम्ही रस्त्यांवरून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा चित्रलेखा पाटील यांनी घेतला.
दिवाळीपूर्वी रस्ते दुरुस्त न झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेकापाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला दिला. आंदोलनाच्या ठिकाणी त्यांचे आक्रमक रूप पाहून आंदोलकांच्या दंडातही चार हत्तींचे बळ आल्याचे दिसून आले. प्रशासनाचा अधिकारी आंदोलन ठिकाणी येत नसल्याने आंदोलक चांगलेच संतापले. त्यामुळे हे आंदोलन चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर प्रशासनाने आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन दिवाळीपूर्वी रस्ते दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन दिले.
दरम्यान, आंदोलन सुरू असताना रस्ते बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती मात्र या मार्गावरून जाणाऱ्या रुग्णवाहिका तसेच स्कूल बस यांना आंदोलकांनी रस्ता करून दिल्याचे दिसून आले.
या प्रसंगी शेकाप महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख महाराष्ट्र एडवोकेट मानसी म्हात्रे, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा सहचिटणीस गौतम पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, युवक संघटना अध्यक्ष अलिबाग तालुका विक्रांत वार्डे, माजी तालुका चिटणीस अनिल शांताराम पाटील, तालुका अध्यक्ष शेतकरी सभा अनिल गोमा पाटील, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य अनिल परशुराम पाटील, तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, दिगंबर म्हात्रे, अमरनाथ पाटील, निलेश खोत, गणेश मढवी, विजय गिदी, विलास म्हात्रे, हर्षदा मेयेकर, सोनाली मोरे, सुधीर थळे, संजना किरण, नागेश कुलकर्णी आणि विविध तालुक्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…….




