ताज्या बातम्यारायगड
अलिबाग-रोहा मार्ग: मृत्यूशी केलेला करार! भ्रष्ट ठेकेदार, PWD अधिकारी आणि परिवहन विभाग जबाबदार!

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : अलिबाग-रोहा मार्गावरचा प्रत्येक प्रवास हा आता मृत्यूशी केलेला करार ठरत आहे. पूल ढासळले, रस्ते खचले, एस.टी. बंद – आणि जनता रोजच्या रोज यातना सोसतेय. पण प्रशासन मात्र डोळे झाकून बसलंय! विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधींचे टेंडर, फितूर ठेकेदार, भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाने हा मार्ग अक्षरशः नरकयात्रा बनवला आहे. सावित्री नदी दुर्घटनेचा धडा विसरलंय का हे सरकार?
पूल म्हणजे मृत्यूचे सापळे
बेली पूल ढासळल्याने वाहतूक पाल्हे पुलावर वळवली गेली होती. पण पाल्हे पूल दोन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी बंदच आहे. नवघर पूल धोकादायक झाल्याने एस.टी. बससेवा थेट बंद करण्यात आली आहे. म्हणजे MSRTC चा संपूर्ण कारभार कोलमडलेला आहे.
गावोगावी अडकली जनता
बससेवा बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, भाजीविक्रेते आणि शेतकरी हवालदिल झाले आहेत. खाजगी वाहनांचा खर्च परवडत नाही. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि शेती बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे हे सर्वच थांबून गेलेले.
जबाबदार कोण?
PWD (सार्वजनिक बांधकाम विभाग) – ज्यांच्या डोळ्यासमोर पूल धोकादायक झाले, पण त्यांनी तातडीची दुरुस्ती केली नाही.
MSRTC (राज्य परिवहन विभाग) – ज्यांनी प्रवाशांना पर्याय न देता सेवा थेट बंद केली.
भ्रष्ट ठेकेदार – ज्यांनी कोट्यवधींचा निधी गिळंकृत करून जनतेला मृत्यूच्या उंबरठ्यावर ढकलले. जिल्हा प्रशासन – ज्यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही.
नागरिकांचा संताप
नागरिक आता थेट विचारताहेत – “जनतेच्या जीवाची किंमत सरकारला नाही का? पुन्हा एखाद्या सावित्री नदीसारख्या दुर्घटनेचीच वाट पाहायची आहे का?”
पुरोगामी युवक संघटनेचा इशारा
शेकाप पुरोगामी युवक संघटनेने प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे की: एस.टी. सेवा तातडीने सुरू झाली नाही, पूल-रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती झाली नाही, आणि भ्रष्ट ठेकेदार व निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. उलट गिनती सुरू झाली आहे आणि आता आंदोलन अटळ आहे!




