क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
समुद्रकिनाऱ्यावर देशभक्तीची चाकं फिरली; सीआयएसएफ मोहिमेचे अलिबागमध्ये स्वागत

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
देशाच्या किनारपट्टीवरून जनजागृतीचा संदेश घेऊन निघालेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) “वंदे मातरम् कोस्टल सायकलेथॉन २०२६” मोहिमेचे अलिबागमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. सारखेल कान्होजी आंग्रे नगरीत आयोजित विशेष कार्यक्रमात आरसीएफचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे आणि डेप्युटी कमांडंट संदीप चक्रवर्ती यांच्या उपस्थितीत जवानांचा गौरव करण्यात आला.
या मोहिमेचा उद्देश केवळ क्रीडा उपक्रम नसून देशाच्या सागरी सुरक्षेबाबत जनजागृती करणे आणि ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचवणे हा आहे. २८ जानेवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत सीआयएसएफचे दोन पथक ९ किनारी राज्ये व ४ केंद्रशासित प्रदेशांमधून तब्बल ६,५५३ किलोमीटरचा प्रवास सायकलवर करीत आहेत. पश्चिम किनाऱ्यावरून गुजरातच्या लखपत किल्ल्यावरून आणि पूर्व किनाऱ्यावरून पश्चिम बंगालच्या बक्खली येथून हे पथक निघाले असून समारोप केरळमधील कोची येथे होणार आहे.
या सायकलेथॉनमध्ये एकूण १३० जवान सहभागी असून त्यातील ६५ महिला सायकलपटूंचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे. महिला जवानांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग हा ‘सुरक्षा आणि समानता’ या दुहेरी संदेशाचे प्रतीक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
मुंबईत ११ फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे अंडर-१९ क्रिकेट विश्वविजेता कर्णधार आयुष म्हात्रे यांच्या उपस्थितीत या पथकाचे स्वागत झाले होते. त्यानंतर १२ फेब्रुवारीला अलिबाग येथे आरसीएफ वसाहतीत झालेल्या कार्यक्रमात सहभागी जवानांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात डेप्युटी कमांडंट संदीप चक्रवर्ती यांनी मोहिमेदरम्यान किनारपट्टीवरील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सुरक्षेबाबत वाढलेली जागरूकता याचा अनुभव सांगितला. यावेळी सीआयएसएफ कर्मचारी, आरसीएफ शाळा व गोंधळपाडा झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. थळ येथील साईकृपा म्युझिक ग्रुपच्या ब्रास बँडवर सादर झालेल्या ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.
सूत्रसंचालन संतोष वझे यांनी केले तर असिस्टंट कमांडंट यू. बी. मीना यांनी आभार मानले.




