ताज्या बातम्यारायगड
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलं; शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष अनावर होईल : शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : अलिबाग तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी तीव्र मागणी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केली आहे.
“पिके कापणीस तयार होती. अनेक शेतकऱ्यांनी भात शेतातच ठेवला होता. पण अवकाळी पावसाने संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरवलं. काहींची पिकं वाऱ्याने पडली, काहींच्या शेतात पाणी साचलं. हा फक्त पिकांचा नाही तर शेतकऱ्यांच्या आशेचा अंत आहे.” असा इशारा घरत यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, “दरवर्षी पंचनाम्यांची नौटंकी करून शासन फसवतं. पण शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा एक रुपयाही जमा होत नाही. फक्त कागदोपत्री आश्वासनं आणि फोटोसेशन सुरू असतात. या वेळी जर शासनाने पुन्हा जनतेला फसवण्याचा प्रयत्न केला, तर शेतकऱ्यांचा रोष अनावर होईल आणि हा राग घोषणांमध्ये नव्हे, कृतीतून दिसेल.”
घरत यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधत सांगितले, की “सत्तेत असणाऱ्यांनीच शेतकऱ्यांचा आवाज उठवायला हवा होता. पण सत्तेच्या मोहात त्यांनी जनतेच्या वेदनेपासूनचं तोंड वळवलं आहे. सत्ताधाऱ्यांना खुर्ची महत्त्वाची वाटते, शेतकऱ्याचं आयुष्य नाही. म्हणूनच आज लोकांच्या अपेक्षा पूर्णपणे संपल्या आहेत.”
“शेतकऱ्यांच्या वेदनेची किंमत केवळ नुकसानभरपाई नाही, तर त्यांच्या मेहनतीला न्याय मिळवून देणं आहे. शेतकरी कामगार पक्ष शेतकऱ्यांच्या लढ्यात आजही आणि उद्याही ठामपणे उभा राहील. ही आमची वचनबद्धता आहे आणि जनतेचा आमच्यावर असलेला विश्वास आमची ताकद आहे.” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“शासन जागं होईल की शेतकऱ्यांचा स्फोट दाखवेल? हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, शेकाप शेतकऱ्यांना कधीच एकटं सोडणार नाही. हा पक्ष जनतेचा आहे, जनतेसाठी आहे आणि जनतेसाठीच लढतो आहे.” शेवटी घरत यांनी सरकारला थेट इशारा देताना सांगितले.




