ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडवर पावसाचा प्रहार; माथेरानमध्ये ३६० मिमी, प्रशासनाच्या धाडसी मोहिमेत १२३ जणांना जीवनदान 

जिल्ह्याची सरासरी १३४.३७ मिमी; अनेक तालुक्यांत मुसळधार पाऊस, पुरग्रस्त भागांत रात्रभर बचावकार्य


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग |
रायगड जिल्ह्यात मंगळवारी (८ जुलै) पावसाचा जोर कायम राहिला असून, जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद माथेरान येथे तब्बल ३६० मिमी झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात एकूण २,१५० मिमी पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्याची सरासरी १३४.३७ मिमी इतकी आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, जिल्हा प्रशासन, महसूल यंत्रणा आणि ‘आपदा मित्र’ यांच्या संयुक्त बचाव मोहिमेत विविध ठिकाणांहून १२३ नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
तालुकानिहाय पर्जन्यमानात कर्जतमध्ये १८६ मिमी, पनवेलमध्ये १८४ मिमी, सुधागडमध्ये १६४ मिमी, म्हसळ्यात १६० मिमी, महाडमध्ये १४५ मिमी, खालापूरमध्ये १२० मिमी, पेण आणि पोलादपूरमध्ये प्रत्येकी ११५ मिमी, उरणमध्ये ११४ मिमी, तळा ९८ मिमी, रोहा ९७ मिमी, माणगाव ८५ मिमी, मुरूड ८४ मिमी, श्रीवर्धन ७७ मिमी आणि अलिबागमध्ये ४६ मिमी पावसाची नोंद झाली.
पेण तालुक्यातील जिते गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या १६ नागरिकांची, तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील हॉटेल हिमगौरी येथे अडकलेल्या ३० जणांची मध्यरात्री धाडसी बचाव मोहिमेद्वारे सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर नागोठणे बाजारपेठेतील १८ नागरिक, नागोठणे एमआयडीसी पंप हाऊसमधील ३ कर्मचारी, वाकण फाटा परिसरातील फार्महाऊसमधील १२ कर्मचारी, पुई (लेपरची खाटे) येथील ३५ नागरिक, उडदवणे फाटा येथील ८ परप्रांतीय कामगार आणि मेडा येथील एका व्यक्तीचीही सुरक्षित सुटका करण्यात आली.
दरम्यान, भिसे खिंड येथे मुसळधार पावसामुळे चार वेळा दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून दरडी व रस्त्यावर पडलेली झाडे हटवत वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला. प्रतिकूल हवामानातही पथकाने सातत्याने कार्यरत राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
जिल्हाधिकारी किशन जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, पेण उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तान्हाजी शेजाळ, महसूल विभाग, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि ‘आपदा मित्र’ यांच्या प्रभावी समन्वयामुळे या सर्व बचाव मोहिमा यशस्वी ठरल्या.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले, ओढे आणि धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, पूरग्रस्त भाग आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यात जाणे टाळावे तसेच हवामान विभाग व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
…..

Related Articles

Back to top button