ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक?; विजयला रोखण्यासाठी भाजपचा सत्ता गेम, १०८ आमदारांच्या राजीनामा इशाऱ्याने खळबळ


फडशा 
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
आविष्कार देसाई 
मुंबई  |
तामिळनाडुतील सत्तास्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला असून, आता या संघर्षाला थेट राजकीय सूड आणि दिल्लीच्या हस्तक्षेपाची किनार मिळू लागली आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यपाल आर. एन. आर्लेकर वेळकाढूपणा करत असल्याचा गंभीर आरोप राजकीय वर्तुळात केला जात आहे.
थलपती विजय यांच्या टीव्हीकेनं १०८ जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. मात्र दोन वेळा राज्यपालांची भेट घेऊनही विजय यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. उलट ११८ आमदारांच्या पाठिंब्याची पत्रं घेऊन या, अशी अट राज्यपालांनी घातल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
दरम्यान, टीव्हीकेनं डीएमके आणि एआयडीएमकेला थेट इशाराच दिला आहे. “स्टालिन किंवा पलानीस्वामी यांनी सरकार स्थापनेचा दावा केल्यास आमचे सर्व १०८ आमदार राजीनामा देतील,” असा इशारा टीव्हीकेकडून देण्यात आल्याचं बोललं जात आहे. या धमकीमुळे तामिळनाडुच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपला आपल्या मर्जीतल्या एआयडीएमकेला पुन्हा सत्तेत आणायचं आहे. त्यासाठी कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या डीएमकेलाही सत्तासमीकरणात सहभागी करून घेत विजय यांना बाहेर ठेवण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्यपालांची भूमिका आता पूर्णपणे राजकीय असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
टीव्हीकेला काँग्रेसच्या पाच आमदारांचा पाठिंबा मिळाला असला तरी बहुमतासाठी अजून काही आमदारांची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर टीव्हीकेच्या नेत्यांनी माकप आणि भाकपच्या नेत्यांशीही चर्चा केली. मात्र त्या चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
दरम्यान, डीएमके आणि एआयडीएमकेच्या स्वतंत्र बैठका पार पडल्याने पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. विजय यांची वाढती लोकप्रियता आणि पहिल्याच निवडणुकीत मिळालेलं प्रचंड यश पाहता, त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘राजकीय चक्रव्यूह’ रचला जात असल्याची भावना आता टीव्हीके समर्थकांमध्ये तीव्र होत आहे.
तामिळनाडुच्या राजकारणात आता प्रश्न एकाच गोष्टीचा आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही विजय यांना सत्ता नाकारली जाणार का? आणि राज्यपालांची भूमिका घटनात्मक आहे की राजकीय, यावरून नवा वाद पेटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
तामिळनाडुत भाजपची थेट ताकद मर्यादित असली तरी सत्तेच्या समीकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विजय यांच्या टीव्हीकेनं पहिल्याच निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना मोठं आव्हान दिल्यानंतर भाजपची अस्वस्थता वाढल्याचं बोललं जात आहे. विशेषतः दक्षिणेत स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला स्वतंत्र आणि आक्रमक प्रादेशिक नेतृत्व उभं राहणं धोक्याचं वाटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यपालांची भूमिका अधिकच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही टीव्हीकेला तातडीने निमंत्रण न देणं, बहुमतासाठी अतिरिक्त वेळ देणं आणि त्याचवेळी डीएमके-एआयडीएमकेच्या हालचालींना मोकळं मैदान मिळणं, हे सर्व पूर्वनियोजित राजकीय रणनीतीचा भाग असल्याचा आरोप केला जात आहे. “दिल्लीच्या इशाऱ्यावर तामिळनाडुत सत्ता समीकरणं बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा दावा आता टीव्हीके समर्थक उघडपणे करू लागले आहेत.
टीव्हीकेच्या सर्व १०८ आमदारांनी राजीनामे दिल्यास काय?
………
टीव्हीकेच्या सर्व १०८ आमदारांनी राजीनामे दिल्यास तामिळनाडुत अभूतपूर्व घटनात्मक संकट निर्माण होऊ शकतं. तामिळनाडू विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २३४ असून बहुमतासाठी ११८ आमदारांची आवश्यकता असते. मात्र मोठ्या प्रमाणावर राजीनामे स्वीकारले गेल्यास सभागृहाची प्रभावी सदस्यसंख्या कमी होऊ शकते आणि त्यानुसार बहुमताचा आकडाही बदलू शकतो. त्यामुळे सत्तेची संपूर्ण गणितंच उलटी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button