ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
सत्ता तुमची, फाईल्स तुमच्या – तरी दोष शेकापावर? ही राजकारणाची रणनीती नाही… भाजपची बौद्धिक दिवाळखोरी आहे!
अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचा भाजपचे सतीश धारप यांच्यावर जोरदार पलटवार

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : भाजपचे सतीश धरप यांनी केलेला आरोप म्हणजे राजकीय निराशा, भिती आणि असहायतेचा पोकळ आरडाओरडा आहे. शेकापचा हद्दवाढीला कधीच विरोध नव्हता आणि कधीच राहणार नाही,” हद्दवाढ झाल्यावर शेकापची ताकद वाढेल याची जीवघेणी घबराहट भाजपला झालेली आहे, असा तुफानी आणि धारदार पलटवार अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केला.
“भाजपकडे सत्ता, ताकद, सरकार — मग हद्दवाढ थांबवतोय कोण?
नाईकांनी भाजपला अक्षरशः चिरलं, “राज्यात आणि केंद्रात सत्ता तुमची, फाइल्स तुमच्याकडे, अधिकारी तुमचे आणि तरीही हद्दवाढ झाली नाही तर याला जबाबदार कोण? शेकाप? की भाजपची स्वतःची अक्षमता?” “शेकाप हद्दवाढ रोखतोय हा आरोप म्हणजे भाजपची राजकीय अक्कल दिवाळखोरीत गेल्याचा पुरावा आहे”, असा जोरदार हल्ला नाईक यांनी केला.
“ज्या भागात तुम्ही शिरकाव करायलाही घाबरता, त्या भागात शेकाप मजबूत आहे!”
नाईक पुढे म्हणाले, “हद्दवाढ झाली तर शेकाप संपेल असं म्हणणाऱ्यांनी आधी भूगोल तरी बघावा! ज्या भागात तुमचे झेंडे लावायलाही लोक तयार नाहीत, तिथे शेकापची नाळ जोडलेली आहे. जनमानसावर विश्वास आणि जमीनीवर संघटन ही शेकापाची जमेची बाजू आहे.” “हद्दवाढ म्हणजे शेकापचा अंत नव्हे, तो भाजपच्या भ्रमांचा अंत आहे.”
चार वर्षांपासून प्रशासक — मग शेकाप कसा गुन्हेगार?
नाईकांचा आणखी एक हल्ला, “चार वर्षांपासून नगरपरिषद प्रशासक चालवत आहे. तो तुमच्या सरकारच्या आदेशाने बसलेला आहे. तरीही काही अडचणी असतील तर त्या शेकापमुळे नाही, तर भाजपच्या भंपक निती आणि निकृष्ट प्रशासनामुळे आहेत.”
“घरपट्टी माफ? कशावर? हवा, धूर, की WhatsApp फॉरवर्डवर?”
नाईकांनी भाजपच्या आश्वासनांची खिल्ली उडवत विचारलं, “निवडणुकीच्या तोंडावर पाच वर्षे घरपट्टी माफ करणार म्हणता? कायद्याची तरतूद कुठे? अर्थसंकल्प कुठे? की फक्त जुमले आणि घोषणांचा धूर फेकायचा?”, असा पलटवार त्यांनी केला.
“शेकापने अलिबागची सत्ता चालवली — तुम्ही फक्त पोस्टर आणि घोषणाबाजी केली!”
नाईकांनी थेट टोला मारला, “2021 पर्यंतचा अलिबाग नगर परिषदेतील माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कारकीर्दीतील कारभार स्वच्छ, पारदर्शक आणि कामांनी भरलेला होता. आणि भाजप? सोशल मीडियावर फोटो, सभेत घोषणा आणि प्रत्यक्षात शून्य!”, असे नाईक यांनी सांगितले.
अंतिम सर्जनशील प्रहार करताना नाईक म्हणाले,
“हा संघर्ष सीमांचा नाही, तर हा विचारधारेचा सामना आहे. सत्ता येते-जाते, पण जनता उभी राहिली की ताकद आपोआप वाढते. आज परिस्थिती बदलतेय, आणि उद्या इतिहास लिहिला जाईल आणि तो आम्हीच लिहिणार, हे लक्षात ठेवा.”
…….




