ताज्या बातम्या

विकासाच्या गप्पा आणि महागाईची झळ; सरकारला आरसा दाखवणारे बैलगाडी आंदोलन, राजाभाऊ ठाकूर यांचा झावळ्यांतून अनोखा निषेध


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग | 

एकीकडे विकासाच्या दाव्यांचा गजर आणि दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना रायगड जिल्हा काँग्रेसने शुक्रवारी अलिबागमध्ये बैलगाडी आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. बैलगाडी, बैलजोडी, घोषणाबाजी आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
रायगड जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, जिल्हाध्यक्ष डॉ. मनिष पाटील तसेच पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. काँग्रेस भवन येथून सुरू झालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनातील सर्वात मोठे आकर्षण ठरली ती बैलगाडी आणि बैलजोडी. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा पारंपरिक वाहतुकीच्या साधनांची आठवण करून देणारी ही प्रतीकात्मक कृती असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना सामान्य माणूस मात्र महागाईच्या विळख्यात अडकला असल्याचा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.
यावेळी राजाभाऊ ठाकूर यांनी कमरेला माडाच्या झावळ्या बांधून सरकारविरोधात वेगळ्याच शैलीत निषेध नोंदवला. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांची आर्थिक अवस्था बिकट झाली असून सरकारच्या धोरणांमुळे जनतेची अक्षरशः फरफट होत असल्याचे प्रतीक म्हणून त्यांनी हा अनोखा निषेध केल्याची चर्चा आंदोलनस्थळी रंगली होती.
“महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे”, “इंधन दरवाढ थांबवा”, “गॅस दर कमी करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. भाजपच्या जुन्या कार्यालयासमोर काही काळ ठिय्या आंदोलन करून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर टीका करत पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप केला. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने दरकपात करावी, अशी मागणीही करण्यात आली.
बैलगाडीच्या माध्यमातून सरकारला आरसा दाखवण्याचा प्रयत्न आणि राजाभाऊ ठाकूर यांच्या झावळ्यांतील अनोख्या निषेधामुळे हे आंदोलन केवळ राजकीय कार्यक्रम न राहता महागाईविरोधातील जनभावनांचे प्रतीक ठरल्याची चर्चा अलिबागमध्ये दिवसभर सुरू होती.


Related Articles

Back to top button