ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
‘पॉवर रीलोड’सह काँग्रेस मैदानात; रायगडमध्ये पुनरागमनाची जोरदार चाहूल
“संघटन सृजन अभियानातून जिल्हा ढवळून निघणार; कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी, काँग्रेसचा आक्रमक अवतार”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
‘संघटन सृजन अभियान’मुळे रायगडमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जोरदार पुनरागमनाच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. “काँग्रेस संपली” असा खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार करणाऱ्यांना हे अभियान थेट आणि ठोस प्रत्युत्तर देत असून, तळागाळात काँग्रेस पुन्हा आक्रमकपणे उभी राहत आहे,” असा घणाघाती दावा काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा रायगडच्या निरीक्षक डॉ. रागिनी नायक यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, “काँग्रेस कमजोर नाही तर संघटित होऊन नव्या ताकदीने मैदानात उतरत आहे. जनतेच्या प्रश्नांवर लढणारी हीच खरी ताकद असून, रायगडमध्ये काँग्रेस आता केवळ उपस्थित नाही तर निर्णायक भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
अलिबाग येथील बॅरिस्टर ए. आर. अंतुले भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा प्रभारी प्रदीप राव, मनीष गणोरे (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), तसेच राजेंद्र ठाकूर, योगेश मगर, अॅड. श्रद्धा ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायगडमध्ये काँग्रेस अस्तित्वासाठी झगडत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी थेट पलटवार करत, “ही परिस्थिती विरोधकांनी रंगवलेली आहे. वास्तवात काँग्रेस प्रत्येक तालुक्यात नव्या उमेदीने उभी राहत आहे,” असे सांगितले.
“फक्त निवडणुकीतच काँग्रेस सक्रिय होते” या आरोपालाही त्यांनी फेटाळून लावत, “काँग्रेस हा रस्त्यावर उतरून जनतेसाठी लढणारा पक्ष आहे आणि हा लढा आता अधिक तीव्र केला जाणार आहे,” असे स्पष्ट केले.
गटबाजीच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट इशारा देत, “संघटनेत शिस्त आवश्यक आहे. गटबाजी सहन केली जाणार नाही,” पण संसार म्हटले की भांड्याला भांड लागणारच, गटबाजी असली तरी आम्ही जनतेसाठी काँग्रेस म्हणून एकच आहोत, असे ठामपणे सांगितले.
“युवकांना काँग्रेसमध्ये भविष्य नाही” या टीकेवर त्यांनी जोरदार उत्तर देत, “काँग्रेसच युवकांना नेतृत्व देणारा पक्ष आहे. नव्या पिढीला संधी देऊन नेतृत्व तयार केले जाणार आहे,” असे सांगितले.
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा’चा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, “जनतेमध्ये जाऊन संवाद साधणे हीच काँग्रेसची खरी ताकद आहे.”
या अभियानांतर्गत जिल्हाध्यक्षांची नियुक्ती, DCC कार्यकारिणीचे पुनर्गठन तसेच ब्लॉक व ग्राम स्तरावरील समित्यांची उभारणी करण्यात येणार आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष अधिक पारदर्शक आणि जनतेशी जोडलेला करण्यावर भर दिला जात आहे. NSUI, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस यांसारख्या संघटनांशी समन्वय साधून सक्रिय नेतृत्व पुढे आणले जाणार आहे.
यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, “रोजगार, महागाई, इंधन दर, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन यांसारख्या मुद्द्यांवर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे,” असा आरोप केला.
अभियानाची रूपरेषा
‘संघटन सृजन अभियान’ 27 मार्च ते 19 एप्रिलदरम्यान राबवले जात असून, त्यानंतर 21 एप्रिलपर्यंत अहवाल All India Congress Committee कडे सादर केला जाणार आहे. अहमदाबाद अधिवेशनानंतर देशभरात संघटनात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, “रायगडमध्ये सुरू झालेले हे अभियान म्हणजे काँग्रेसच्या मोठ्या पुनरागमनाची सुरुवात आहे. आगामी काळात काँग्रेस अधिक आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नांसाठी लढताना दिसेल,” असा विश्वास डॉ. नायक यांनी व्यक्त केला.
रायगडमध्ये काँग्रेस संघटन नव्या उर्जेसह उभी राहत असून, या मोहिमेमुळे पक्ष पुन्हा जनतेच्या विश्वासाच्या केंद्रस्थानी येण्याचे संकेत मिळत आहेत.
———————-
रायगड दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक
दिनांक 29 मार्च 2026 (अलिबाग / रायगड)
सकाळी 10.30 वा. – मुंबईहून अलिबाग येथे आगमन
सकाळी 11.00 वा. – पत्रकार परिषद (बॅरिस्टर ए. आर. अंतुले भवन, अलिबाग)
सकाळी 11.30 वा. – जिल्हा काँग्रेस कमिटी आढावा बैठक व कार्यकर्त्यांशी संवाद (अलिबाग)
दुपारी 2.00 वा. – रायगड भेट
दुपारी 3.00 वा. – रायगड ब्लॉक आढावा बैठक
सायं. 6.00 वा. – अलिबाग ब्लॉक कमिटी आढावा बैठक
रात्री – हॉटेल रवी किरण, अलिबाग येथे विश्रांती
दिनांक 30 मार्च 2026 (कर्जत–खोपोली–रोहा–खालापूर–उरण)
सकाळी 11.00 वा. – कर्जत ब्लॉक कमिटी आढावा बैठक (नेरळ)
दुपारी 1.00 वा. – खोपोली ब्लॉक कमिटी आढावा बैठक
दुपारी 2.00 वा. – रोहा भेट
सायं. 4.00 वा. – खालापूर ब्लॉक कमिटी आढावा बैठक (रीस, खालापूर)
सायं. 5.30 वा. – उरण ब्लॉक कमिटी आढावा बैठक (समाज मंदिर हॉल, शेळघर)
रात्री – उलवे येथे विश्रांती
दिनांक 31 मार्च 2026 (पेण–सुधागड–रोहा–माणगाव–महाड)
सकाळी 11.00 वा. – पेण ब्लॉक कमिटी आढावा बैठक (पेण)
दुपारी 12.00 वा. – सुधागड ब्लॉक कमिटी आढावा बैठक (पेण)
दुपारी 2.00 वा. – रोहा ब्लॉक कमिटी आढावा बैठक (रोहा)
सायं. 4.00 वा. – तळा–माणगाव ब्लॉक कमिटी आढावा बैठक (माणगाव)
सायं. 6.00 वा. – महाड–पोलादपूर ब्लॉक कमिटी आढावा बैठक (महाड)
रात्री – महाड येथे विश्रांती
दिनांक 1 एप्रिल 2026 (म्हसळा–श्रीवर्धन)
सकाळी 11.00 वा. – म्हसळा ब्लॉक कमिटी आढावा बैठक
दुपारी 1.00 वा. – श्रीवर्धन ब्लॉक कमिटी आढावा बैठक
दुपारी – श्रीवर्धन येथून उलवे येथे प्रस्थान
……………



