ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
इतिहासाचा सरळसरळ अपमान की विद्यार्थ्यांच्या मेंदू आणि मनावर लिटमस टेस्ट?
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्याने राज्यात गदारोळ; सारवासारव करत दिला माफीनामा, इतिहासाची पायमल्ली आणि महापुरुषांचा अपमान खपवून घेतला जाणार नसल्याचा शिवराज्य ब्रिगेडचा इशारा

फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
मुंबईत किशोरी पेडणेकर यांनी एबीपी माझासह अन्य डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मेन स्ट्रीम मीडियामध्ये काही वादग्रस्त दावे केल्याचे समोर आले आहे. ते केवळ चुकीचे नाहीत, तर थेट इतिहासाला हरताळ फासणारे आहेत. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणी “मनाचे श्लोक”चा प्रभाव होता; पण ज्या क्षणी आपण याची शहानिशा करतो तेव्हा त्याच क्षणी हे दावे अक्षरशः पत्त्यांप्रमाणे धाडकन कोसळून पडतात.

सभासद बखर आणि चिटणीस बखर यांसारख्या समकालीन बखरींमध्ये रामदास स्वामींचा उल्लेख आहे, पण “गुरु” हा शब्दच नाही. एकदाही नाही; शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या दानपत्रांमध्ये “स्वामी” असा सन्मान आहे, पण “गुरु” नाही. म्हणजेच जे शिवाजी महाराजांनी स्वतः म्हटले नाही, ते आज राजकीय सोयीसाठी त्यांच्या नावावर लादले जात असल्याचे थेट दिसून येते. यालाच शिक्कामोर्तब करत जदुनाथ सरकार यांनी “शिवाजी अँड हिज टाइम्स” मध्ये समर्थ रामदास स्वामी हे केवळ धार्मिक प्रेरणास्थान होते, गुरु नव्हते असे स्पष्ट नमूद केले आहे. तसेच “न्यू हिस्ट्री ऑफ द मराठाज” मध्येही ते गुरु होते याचा ठोस पुरावा नसल्याचे सांगितले आहे.
दुसऱ्या बाजूला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वतःच्या लेखनात “वेटिंग फॉर अ व्हिसा”, “ॲनिहिलेशन ऑफ कास्ट” आणि “द बुद्धा अँड हिज धम्म” या ग्रंथांचा समावेश होतो. या मध्ये कोठेही “मनाचे श्लोक”चा उल्लेख आढळत नाही; म्हणजेच हा दावा केवळ हवेतून उचललेला आहे.
उलट गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले आणि संत कबीर यांचा प्रभाव त्यांनी स्वतः मान्य केला आहे.
यातून किशोरी पेडणेकर यांची बौद्धिक दिवाळखोरी उघडपणे समोर येते. चोहोबाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली.
पण प्रश्न इतक्यावर थांबत नाही.अशी विधाने करून समाजात कोणत्या प्रतिक्रिया उमटतात याची एक प्रकारची “लिटमस टेस्ट” घेण्याची पद्धतच काही राजकारण्यांनी अंगीकारली आहे का, असा संशय अधिक गडद होतो. वाद निर्माण करायचा, प्रतिक्रिया मोजायच्या आणि नंतर माघार घ्यायची हा पॅटर्न नवीन नाही; विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून अशा प्रकारचे प्रयोग वारंवार झाल्याचे अलीकडच्या राजकारणात दिसून आले आहे. त्यामुळे ही केवळ चूक नसून, नियोजित वातावरणनिर्मितीचा भाग आहे का, हा सवाल आता उपस्थित होतो.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी एक गंभीर प्रश्न उभा राहतो तो म्हणजे रामदास स्वामी यांच्या विचारांभोवती उभारल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये काही राजकीय पुढाऱ्यांची उपस्थिती सातत्याने दिसते, आणि त्यातून एक ठराविक विचारधारेभोवती मतदारांचा समूह तयार झाल्याचे चित्र दिसते; मग हा सगळा प्रयत्न त्या तयार झालेल्या मतदारसंघाला आपल्याकडे वळवण्यासाठीच आहे का, असा संशय निर्माण होणे साहजिक आहे.
महापुरुषांच्या नावावर भावनिक वातावरण तयार करून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा हा प्रयत्न नाही ना, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. त्याचबरोबर आणखी एक दावा पुढे केला जातो. उच्चार सुधारण्यासाठी “मनाचे श्लोक” आवश्यक आहेत. पण आजच्या आधुनिक जगात उच्चार, भाषा आणि संवादकौशल्य सुधारण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने विकसित झालेले असंख्य कोर्सेस, स्पीच ट्रेनिंग, भाषा प्रयोगशाळा आणि डिजिटल साधने उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत केवळ धार्मिक किंवा पारंपरिक ग्रंथांवर आधारित एकाच पद्धतीला अपरिहार्य ठरवणे हे तर्कसंगत नाही. उलट विद्यार्थ्यांना आधुनिक, वैज्ञानिक आणि बहुपर्यायी साधनांचा वापर करून सक्षम करणे हीच खरी शिक्षणाची दिशा असायला हवी.
महापुरुषांची नावे पुढे करून विद्यार्थ्यांच्या मनावर विशिष्ट विचार अक्षरशः “घुसवण्याचा” प्रयत्न सुरू आहे; कारण भारत हा विविध धर्मांचा देश असून सर्वांना एकत्र बांधणारे एकमेव तत्त्व म्हणजे भारताचे संविधान होय. जे सर्व धर्मांना समान दर्जा देते. अशा परिस्थितीत शालेय जीवनापासून एखाद्या ठराविक धार्मिक विचाराचे उदात्तीकरण करणे म्हणजे समतेच्या मुळावर घाव घालणेच आहे. हे शिक्षण नाही, ही विचारांची दिशाभूल आहे. जर विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवायचे असेल, तर त्यांना संविधान शिकवले पाहिजे; पण जर त्यांना फक्त मान डोलवणारे बनवायचे असेल, तर अशा कथांनीच काम भागते.
म्हणूनच प्रश्न पडतो की, इतिहास बदलण्याचा अधिकार कोणी दिला? आणि विद्यार्थ्यांच्या मनावर विचार लादण्याचा परवाना देखील कोणी दिला? कारण यातून एक गोष्ट निर्विवादपणे समोर येते की, पुरावे कधीही खोटं बोलत नाहीत, पण राजकीय दावे मात्र वारंवार उघडे पडतात.
……

शैलेश चव्हाण (शिवराज्य ब्रिगेड, महासचिव )
————–
इतिहासाची विकृती, महापुरुषांबद्दल खोटं पसरवणं आणि विद्यार्थ्यांवर एकाच विचारधारेचा प्रभाव टाकून त्यांच्या मेंदूची धुलाई करण्याचे प्रयत्न तात्काळ थांबवावेत. अन्यथा संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. शाळांमध्ये संविधानाची शिकवण देणे उचित ठरेल.
…….




