विरोधकांकडे फुसक्या टिकल्या शिल्लक! आमच्याकडे ‘ॲटम बॉम्ब’, विरोधकांचा ‘काम तमाम’ — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्फोटक हल्ला

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
ठाणे : “महाराष्ट्रात कितीही विरोधक एकत्र आले, ठिकऱ्या उडतील म्हणाले तरी त्यांचं हे सगळं वागणं म्हणजे ‘बोलाची कढी, बोलाचाच भात आणि तोंडाची वाफ!’ त्यांच्याकडे लोक नाहीत, फक्त फटाक्याच्या फुसक्या टिकल्या आहेत; पण आमच्याकडे आहे एकच ॲटम बॉम्ब, विरोधकांचा काम तमाम!” असा स्फोटक हल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता चढवला.
शिंदे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकला आहे आणि आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भगवा फडकेल, असा पुनरुच्चार त्यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना केला.
त्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले की, “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ दिलेली नाही. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि शेतकरी संकटातून सावरत आहे.”
शिंदे पुढे म्हणाले, “महापालिकेतील कर्मचाऱ्यांना वाढ दिल्याने आनंदाचे वातावरण आहे. एसटी महामंडळात २० वर्षांत पहिल्यांदा संप न होता एक लाख कर्मचाऱ्यांना तब्बल १०७ कोटींची वाढ देण्यात आली आहे. हे सरकार काम करतंय, फक्त बोलत नाही!”
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने, “घोड मैदान जवळच आहे, त्यामुळे कोणाच्या ठिकऱ्या उडतील हे लवकरच दिसेल,” असा थेट टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.
त्यांनी पुढे फटकारलं, “जे स्वतःच्या विचारांवर ठाम राहत नाहीत, अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते. त्यांनी आनंद दिघे यांचा अपमान केला आहे. त्यामुळे ठाणेकर जनता त्यांचा बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही! बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आणि आनंद दिघे आमच्या रक्तात आहेत,” असे जाहीर शब्दांत शिंदे म्हणाले.
येत्या निवडणुकांवर थेट इशारा देताना शिंदे म्हणाले, “काही लोक वर्षानुवर्ष घरात बसतात आणि निवडणुका आल्या की जनतेच्या दारात जातात. पण एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक सातत्याने लोकांच्या दारात आहोत. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे; ती काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील आणि घरात बसणाऱ्यांना कायमचे घरात बसवेल!”
ठाण्याच्या जमिनीवर पुन्हा एकदा ठणकावून शिंदे म्हणाले, “मी सातत्याने जनतेच्या संपर्कात असतो, त्यांच्या घरात जातो, म्हणूनच ठाण्यात शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकतो!”



