ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

“एकेकाळचा ‘राजकीय महाराजा’ आज अस्तित्वाच्या उंबरठ्यावर : अलिबागमध्ये शेकापची अखेरची परीक्षा”


फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
अलिबाग : तालुक्यातील येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका म्हणजे लोकशाहीचा साधा सोहळा उरलेला नाही. ही निवडणूक म्हणजे थेट राजकीय अस्तित्वावर उठलेला प्रश्नचिन्ह आहे. एका बाजूला एकेकाळी रायगडच्या सत्तेचा कणा असलेला शेतकरी कामगार पक्ष आज अखेरच्या श्वासावर लढताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटासाठी अलिबागवर निर्विवाद वर्चस्व मिळवण्याची ही निर्णायक संधी ठरणार आहे.
ज्या रायगडमध्ये कधीकाळी शेकापचा शब्द म्हणजे आदेश मानला जायचा, जिथे जिल्हा परिषदेत 23 सदस्य निवडून आणण्याची ताकद होती, तिथे आज तोच पक्ष गळती, फुटी आणि नेतृत्वशून्यतेच्या दलदलीत रुतलेला दिसतो. 18 सदस्यांवर मर्यादित असलेली शिवसेना आज इतिहास ठरली आहे; वास्तवात सत्ता, संघटना आणि निवडणूक जिंकणारे चेहरे आता पूर्णपणे शिंदे गटाकडे झुकलेले दिसत आहेत. आकडे बदलले नाहीत, पण राजकारणाची दिशा मात्र पूर्णपणे उलटली आहे.
शिवसेना फुटली… पण गणित शिंदेंच्या बाजूने 
एकीकडे शिवसेना शिंदे गट
आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट
मात्र अलिबाग आणि रायगडच्या राजकारणात एक गोष्ट निर्विवाद आहे. उद्धव ठाकरे गटाची ताकद झपाट्याने कमी होत चालली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, निवडून आलेले प्रतिनिधी या गटाला सोडून गेलेत. मैदानात प्रत्यक्ष लढणारी ताकद आज त्यांच्या हातात उरलेली नाही.
याच्या अगदी उलट चित्र शिंदे गटाचे आहे. सत्ता, संघटना, निधी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक जिंकणारे चेहरे हे सगळं शिंदे गटाकडे एकवटलेलं दिसतंय.
शेकापची किल्लेध्वस्ती : एकही किल्ला सुरक्षित राहिला नाही
शेकापसाठी खरी धोक्याची घंटा आता नव्हे, तर आधीच वाजलेली आहे. ज्या उमेदवारांच्या खांद्यावर शेकापने जिल्हा परिषद जिंकली होती, तेच सगळे चेहरे आज विरोधकांच्या तंबूत उभे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शहापूर – भावना पाटील (भाजपा), कुर्डूस – चित्रा पाटील (भाजप)
चेंढरे – प्रियदर्शनी पाटील (भाजप)
मापगाव – दिलीप भोईर उर्फ छोटम (शिंदे गट)
याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की, शेकापकडे मतं होती, पण ती धरून ठेवण्याची ताकद राहिली नाही.
ज्यांनी निवडणूक जिंकून दिली, तेच आज शेकापविरोधात उभे ठाकले आहेत. ही केवळ गळती नाही, ही पक्षाची संरचनात्मक पडझड आहे.
आज शेकापकडे निष्ठावान कार्यकर्ते उरले असतील, पण निवडणूक जिंकणारे चेहरे मात्र जवळपास संपले आहेत. आणि राजकारणात भावना चालतात, पण निकाल चेहरेच देतात. हे कटू सत्य शेकापला आता मान्य करावं लागणार आहे.
शेकापक्षासाठी ‘अस्तित्वाची लढाई’
अलिबाग पंचायत समिती सध्या शेकापकडे होती, तरी ती सत्ता टिकेल याची कोणतीही खात्री नाही. बदललेली राजकीय समीकरणे, फुटलेली संघटना आणि हातातून निसटलेले नेते पाहता, ही निवडणूक शेकापसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
दुसरीकडे, शिंदे गटासाठी ही संधी आहे
अलिबागवर कायमचा झेंडा रोवण्याची.
शेतकरी कामगार पक्ष कुठे चुकला, याचं उत्तर एकाच वाक्यात द्यायचं झालं तर वेळेवर बदल न स्वीकारणे, विजयी उमेदवारांना पक्षात बांधून ठेवण्यात अपयश, वरिष्ठ नेतृत्व आणि स्थानिक कार्यकर्त्यांमधील वाढलेला दुरावा, सत्ताकेंद्रित बदलत्या राजकारणाची वेळेत दखल न घेणं, नव्या व तरुण नेतृत्वाला संधी न देणं, फुट रोखण्यासाठी आवश्यक राजकीय लवचिकतेचा अभाव आणि सलग पराभवानंतरही ठोस आत्मपरीक्षण न करणं  या सगळ्या चुका एकत्र आल्या आणि शेकापची एकेकाळची भक्कम संघटनात्मक इमारत हळूहळू आतूनच कोसळत गेली.
“आता शेकापने काय केलं पाहिजे?” 
शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा उभं राहायचं असेल, तर अर्धवट उपाय नव्हे तर कडक उपाययोजना करावी लागेल. जुनी चौकट मोडून स्थानिक पातळीवर विश्वासार्ह आणि जिंकाऊ चेहरे पुढे आणणे, पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर रडत बसण्याऐवजी नवी नेतृत्व फळी घडवणे, कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून निर्णयप्रक्रिया विकेंद्रित करणे, बदललेल्या सत्ताकेंद्रित राजकारणाची वस्तुस्थिती मान्य करून रणनीती ठरवणे, तरुणांना स्पष्ट भूमिका व संधी देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पराभवाचं निर्भीड आत्मपरीक्षण करून दोषींवर नव्हे तर चुकीच्या पद्धतींवर घाव घालणे हे सगळं केल्याशिवाय शेकापसाठी “पुन्हा उभं राहणं” हा केवळ स्वप्नच राहील, वास्तव नाही.
….

Related Articles

Back to top button