ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
“राजकारणात नकाराचं मार्केटिंग? उमेदवारी नाकारूनही अनिकेत तटकरे चर्चेच्या केंद्रस्थानी!” तिकीट नाही… तरीही चर्चा फुल ऑन! अनिकेत तटकरे नावामागचं राजकारण काय?

राजकारणात सध्या एक नवं समीकरण आकार घेतंय का? तिकीट मिळालं तर बातमी होतेच, पण तिकीट नाकारलं तरीही नाव चर्चेच्या शिखरावर कसं पोहोचतं? आधी नाव पुढे येतं, वातावरण तापतं आणि मग अचानक “मी स्पर्धेतच नाही” असा नकार दिला जातो. हा केवळ योगायोग आहे का, की ठरवून आखलेली रणनीती? उमेदवारी नसतानाही चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची ही कला म्हणजेच “नकाराचं मार्केटिंग” आहे का, असा प्रश्न आता उघडपणे विचारला जातोय.
____________________________________________
फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
अलिबाग |
राजकारणात सध्या एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. तिकीट मिळालं की बातमी होतेच, पण तिकीट “नाकारलं” तरीही नाव ट्रेंडमध्ये येतं. अनिकेत तटकरे यांच्या बाबतीतही नेमकं तेच चित्र दिसून आलं. विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांचं नाव अचानक चर्चेत आलं आणि त्यांनी लगेच समोर येत, “मी स्पर्धेतच नाही, या सगळ्या बातम्या निराधार आहेत,” असं स्पष्ट केलं. मात्र इथेच खरी खेळी सुरू होते, कारण ज्या नावाचा उमेदवारीशी काही संबंध नाही, ते नाव अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी कसं येतं, हा प्रश्न निर्माण होतो.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा योगायोग नसून एक नवा पॅटर्न असू शकतो. आधी एखादं नाव चर्चेत आणायचं, मग स्वतःहून नकार द्यायचा आणि त्यातून “स्वच्छ, निस्वार्थ” अशी प्रतिमा उभी करायची, अशी ही नवी रणनीती मानली जाते. अलीकडे ती राजकारणामध्ये सर्रास वापरली जात असल्याचं आपल्याला प्रकर्षाने दिसून येतं. म्हणजे उमेदवारी नसतानाही पब्लिसिटी मात्र जोरदार मिळते. त्यामुळे “नाही म्हणताच नाव मोठं” हा फॉर्म्युला आता राजकारणात वापरला जातोय का, याची चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्या मुलासाठी प्रयत्न करत असल्याच्या बातम्यांनी या प्रकरणाला वेगळाच रंग दिला. पण या बातम्या अचानक का समोर आल्या आणि त्यानंतर लगेच नकार देत इमेज क्लीन करण्याचा प्रयत्न झाला का, हा प्रश्नही उपस्थित होतो. कारण राजकारणात आरोपसुद्धा कधी कधी फायद्याचे ठरतात; तेच एखाद्या नेत्याला चर्चेच्या केंद्रस्थानी आणतात.
वास्तव मात्र वेगळंच आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूकच झालेली नाही, त्यामुळे उमेदवारीचा प्रश्नच नव्हता. तरीही नाव चर्चेत आलं आणि नंतरच्या नकारानंतर ते अधिकच गाजू लागलं. अनिकेत तटकरे यांनी स्पष्ट केलं की ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. मात्र वास्तव असं की, नकार दिल्यानंतरच त्यांचं नाव अधिक चर्चेत आलं आहे.
एकूणच पाहता, हे फक्त एक स्पष्टीकरण नाही, तर राजकारणात “नकाराचं मार्केटिंग” कसं केलं जातं याचं उत्तम उदाहरण ठरते. आजच्या घडीला तिकीट मिळणं इतकं महत्त्वाचं राहिलेलं नाही, जितकं तिकीट नाकारूनही चर्चेत राहणं महत्त्वाचं झालं आहे. राजकारणात सध्या हाच ट्रेंडी पॅटर्न ठरत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
……




