“एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार!” — शिंदेंकडून दिलासादायक घोषणा; थकीत रक्कम, अनुदान आणि उचल जाहीर
एसटी मधील 85 हजार कर्मचारी अधिकारी यांना होणार थेट फायदा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई, ता. 13 : “एसटी म्हणजे जनतेची जीवनवाहक आणि कर्मचाऱ्यांचा अभिमान,” असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारी घोषणा केली. अनेक महिन्यांपासून थकीत रक्कम, पगारवाढ आणि अनुदानाची मागणी करत थकलेले एसटी कर्मचारी अखेर दिवाळीपूर्वीच सरकारकडून दिलासा मिळवणार आहेत.

शिंदे यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी असलेली साडेसहा हजार रुपयांची पगारवाढ मान्य करण्याच्या दिशेने सरकारने निर्णय घेतला असून, थकीत रक्कम तात्काळ सुरू करण्यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्याचबरोबर, दरवर्षीप्रमाणे सहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचाही निर्णय झाला असून, त्यासाठी 51 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून 12,500 रुपयांची उचल देण्याची तरतूद एसटी महामंडळ करणार आहे. या सर्व निर्णयांचा सुमारे 85,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना थेट फायदा होणार आहे.

सह्याद्री अतिथी गृहात आज एसटीच्या विविध कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले,
“एसटी ही फक्त एक वाहतूक सेवा नाही, तर गावागावच्या सामान्य माणसाचा श्वास आहे. दिवाळीच्या काळात हे कर्मचारी दुःखी राहू नयेत, हीच आमची भूमिका आहे. त्यांची दिवाळी गोड होईल, याची काळजी आम्ही घेतली आहे.”
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या बैठकीत सांगितले की, एसटी महामंडळ पुन्हा सक्षम आणि स्वावलंबी व्हावे, यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. “एसटीकडे स्वतः उभं राहण्यासाठी पुरेसे साधनसंपन्न स्रोत आहेत; आम्ही ते सक्रियपणे वापरणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान सर्व युनियन पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. शिंदे यांनी सांगितले की,
“एसटी कर्मचारी हे आपले कुटुंबच आहेत. त्यांच्या घरी दिवाळीचे दिवे हसरे राहावेत, हा सरकारचा प्रयत्न आहे.”




