ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“स्वच्छ भारतासाठी आयटीआय पॅटर्न – राज्यभर ७५० गावांत मोहीम”
कॅबिनेट मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात स्वच्छता अभियान संपन्न

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
पनवेल, १७ सप्टेंबर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य विकास विभागाच्यावतीने “स्वच्छता अभियान” राबविण्यात आले. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि ५०० खाजगी आयटीआयच्या हजारो विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून ७५० गावांमध्ये स्वच्छता उपक्रम पार पाडला.

या अभियानाचा शुभारंभ १७ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान यशस्वीपणे पार पडले. त्यांच्या सूचनेनुसार गावागावांत रस्ते, शाळा परिसर, बाजारपेठा आणि सार्वजनिक स्थळांवर युवकांनी झाडू हाती घेत स्वच्छता केली. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
कॅबिनेट मंत्री लोढा म्हणाले,
“पंतप्रधानांच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातील युवकांनी स्वच्छ भारतासाठी घेतलेला पुढाकार अभिमानास्पद आहे. पंतप्रधान नेहमी सांगतात की स्वच्छता केवळ एका दिवसापुरती नसून ती दैनंदिन जीवनाचा भाग असावा. आजच्या स्वच्छता अभियानामुळे तरुण पिढी स्वच्छतेला प्राधान्य देईल आणि स्वच्छ भारतासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता हीच सेवा’ हा संदेश जनमानसात पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त केलेली ही स्वच्छता सेवा अभूतपूर्व ठरेल.”




