अरुण कुमार वैद्य विद्यालयाजवळ विद्युत खांब कोसळला; थोडक्यात मोठी दुर्घटना टळली

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
शहरातील अरुण कुमार वैद्य माध्यमिक विद्यालय परिसरात, हॉटेल नित्यानंद येथील वळणावर गुरुवारी सायंकाळी अचानक विद्युत खांब कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसून मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.
सायंकाळी पावणे सहा ते सहाच्या दरम्यान ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, खांब कोसळण्याच्या काही सेकंद आधीच एक महिला त्या ठिकाणाहून पुढे गेली होती. त्याचवेळी एक वाहनही त्या मार्गावरून निघून गेले होते. काही क्षणांचा फरक पडला असता गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता आली नसती.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली. अचानक मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. विशेष म्हणजे हा मार्ग शहरातील अत्यंत वर्दळीचा मानला जातो. शाळा, हॉटेल तसेच निवासी भाग जवळ असल्याने येथे दिवसभर नागरिकांची ये-जा सुरू असते.
घटनेची माहिती मिळताच अलिबाग नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक आणि नगरसेवक अंकित बंगेरा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
स्थानिक नागरिकांनी शहरातील जुन्या आणि गंजलेल्या विद्युत खांबांच्या स्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी विद्युत खांब गंजलेल्या अवस्थेत असून त्यांची वेळोवेळी तपासणी होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. पावसाळ्यात अशा खांबांमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, अलिबाग नगरपालिकेने शहरातील जुने विद्युत खांब बदलण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन विद्युत खांब उपलब्ध देखील झाले असून ते उभारण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कामाला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे शहरातील सर्व धोकादायक विद्युत खांबांचे तातडीने सर्वेक्षण करून जीर्ण खांब त्वरित बदलण्याची मागणी केली आहे. “आज सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र भविष्यात अशी घटना जीवघेणी ठरू शकते,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे अलिबाग शहरातील सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.




