“वरंध घाट खुला – नागरिकांचा जीव धोक्यात, सणासुदीला दिला हिरवा कंदील”

सत्यमेव जयते न्यू डॉट कॉम
रायगड : वरंध घाट मार्ग पुन्हा सुरु झाला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश काढले आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. पण प्रश्न असा – घाट खरंच सुरक्षित आहे का, की सणासुदीच्या दबावाखाली घेतलेला निर्णय आहे?
गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे आणि हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे घाट बंद करण्यात आला होता. हजारो प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करताना वेळ, पैसा आणि जीवाचा धोका पत्करावा लागला. आता मात्र गणेशोत्सवाच्या तोंडावर घाट सुरु. मग नागरिकांचा जीव फक्त “सण-उत्सवाच्या कॅलेंडर”वर अवलंबून आहे का?
प्रशासनाने आदेशात स्पष्ट लिहिले – “अतिवृष्टी आली तर घाट पुन्हा बंद.” म्हणजे रस्ता दुरुस्त झाला तरी धोका कायम. मग एवढ्या जोखमीवर हा निर्णय का? स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या मागण्या, व्यापाऱ्यांचा दबाव आणि पर्यटनाचा फायदा — हेच खरे कारण नाही का?
फडशा असा की, घाटावरील वाहतूक ही सुरक्षिततेच्या हमीवर नव्हे तर राजकीय आणि आर्थिक दबावावर सुरु होते आणि बंदही. नागरिक मात्र प्रत्येक वेळी बळी ठरतात.




