ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

‘एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’: सत्य उघड करण्याची मागणी की सत्तेला दिलेला इशारा?


जगाला हादरवणाऱ्या ‘एपस्टीन फाईल्स’ उघड होत असताना एकच प्रश्न महासत्तेच्या भोवती घुमतो आहे. हे फक्त एका विकृत अब्जाधीशाचं प्रकरण होतं, की प्रभावशाली लोकांनी जाणीवपूर्वक झाकून ठेवलेला गुन्हेगारी कट? अफवांचा धुरळा उडवून सत्य लपवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ‘एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’ सत्तेला थेट आव्हान देतो आहे. दोषी कोण, संरक्षण कुणाला, आणि इतकी वर्षे मौन पाळणारी व्यवस्था नेमकी कोणाच्या बाजूने उभी होती. या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांवर तथ्यांचा घाव घालणारा हा सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमचा स्पेशल रिपोर्ट.

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम / डिजिटल डेस्क

मुंबई : ‘एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’ हा अमेरिकेत मांडण्यात आलेला एक प्रस्तावित कायदा आहे, जो केवळ कायदेशीर प्रक्रियेपुरता मर्यादित नसून सत्तेच्या गुप्त व्यवहारांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित सर्व गोपनीय सरकारी कागदपत्रे जनतेसमोर आणणे. कारण हा केवळ एका व्यक्तीचा गुन्हा नव्हता, तर प्रभावशाली लोकांनी वेढलेला एक काळा अध्याय होता, अशी गंभीर शंका आजही कायम आहे.
जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील एक अब्जाधीश आणि फायनान्सर होता. त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे, मानव तस्करीचे आणि प्रभावशाली व्यक्तींना गुंतवून चालवलेल्या सेक्स-रॅकेटचे गंभीर आरोप होते. 2019 मध्ये तो अमेरिकेतील तुरुंगात मृतावस्थेत आढळला. हा मृत्यू अधिकृतरीत्या आत्महत्या म्हणून घोषित करण्यात आला, मात्र सीसीटीव्ही फुटेज, सुरक्षा त्रुटी आणि तपासातील विसंगतींमुळे हा निष्कर्ष अनेकांच्या गळ्यात उतरलेला नाही.
एपस्टीनच्या मृत्यूनंतर तपास यंत्रणांच्या हातात हजारो पानांची कागदपत्रे असल्याचे समोर आले. या कागदपत्रांमध्ये साक्षीदारांची जबानी, ई-मेल्स, फोन रेकॉर्ड्स, त्याच्या खाजगी विमानांचे फ्लाइट लॉग्स आणि प्रभावशाली व्यक्तींची नावे आहेत. हीच कागदपत्रे ‘Epstein Files’ म्हणून ओळखली जातात. प्रश्न असा आहे की, जर या फाईल्समध्ये काहीच गंभीर नसतं, तर त्या आजवर गोपनीय का ठेवल्या गेल्या?
याच प्रश्नातून ‘Epstein Files Transparency Act’ जन्माला आला. या कायद्याच्या माध्यमातून सरकारकडे असलेली ही सर्व माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली जात आहे. कोण कोण या गुन्हेगारी जाळ्यात सामील होते, कुणाला तपासापासून वाचवण्यात आले, कोणाच्या दबावाखाली चौकशीची दिशा बदलली गेली — हे सर्व स्पष्ट व्हावे, हा या कायद्यामागचा मूळ हेतू आहे.
हा कायदा महत्त्वाचा ठरण्याचे कारण म्हणजे एपस्टीन प्रकरणात केवळ गुन्हेगारावरच नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेवर संशय घेतला जात आहे. राजकारणी, उद्योगपती, हॉलीवूडमधील सेलिब्रिटी आणि राजघराण्याशी संबंधित व्यक्तींची नावे तपासातून जाणीवपूर्वक बाजूला काढली गेली का, असा थेट आरोप केला जात आहे. त्यामुळे हा कायदा म्हणजे ‘तुम्ही कितीही शक्तिशाली असलात, तरी सत्य लपवू शकत नाही’ असा सत्तेला दिलेला इशारा आहे.
सध्या हा कायदा सर्व फाईल्स एकाचवेळी उघड करत नाही. कायदेशीर मर्यादा, गोपनीयतेचे नियम आणि पीडितांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे केला जात आहे. मात्र न्यायालयांच्या आदेशानुसार काही कागदपत्रे टप्प्याटप्प्याने समोर येत आहेत, आणि प्रत्येक उघडकीसोबत सत्तेच्या विश्वासार्हतेवर नवे प्रश्न उपस्थित होत आहेत.
थोडक्यात सांगायचे तर ‘Epstein Files Transparency Act’ म्हणजे एपस्टीन प्रकरणात नेमके कोण दोषी होते, कोणाला संरक्षण मिळाले आणि सत्य का दडपले गेले, हे जनतेला कळलेच पाहिजे, अशी ठाम मागणी. हा कायदा म्हणजे केवळ कागदपत्रे उघडण्याचा मुद्दा नाही, तर लोकशाहीत पारदर्शकतेचा आणि जबाबदारीचा कस आहे.

Related Articles

Back to top button