ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

“कलाम व्हिजन नॅशनल STEM अँड क्विझ कॉन्क्लेव २०२५” मध्ये रायगडचा अभिमान — युनिव्हर्सल ए.आय. युनिव्हर्सिटी, कर्जतचा अवधूत वारगे ‘टॉप २०’ मध्ये


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे “Kalam Vision National STEM and Quiz Conclave 2025” या राष्ट्रीय विज्ञान अधिवेशनाचे भव्य आयोजन करण्यात आले. देशभरातील २२० पेक्षा अधिक शाळा व महाविद्यालयांमधील ४१५ विद्यार्थी या दोन दिवसांच्या अधिवेशनात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून रायगड जिल्ह्याचा सहभाग विशेष ठरला.
या राष्ट्रीय अधिवेशनाने “युवकांच्या नवकल्पनाशक्तीतूनच भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र उज्ज्वल भविष्य घडवेल” हा डॉ. कलाम यांच्या विचारांचा संदेश पुन्हा अधोरेखित केला. १३ ते १५ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमाने देशभरातील तरुण संशोधकांना नव्या वैज्ञानिक दृष्टीची दिशा दिली.
या अधिवेशनात विद्यार्थ्यांनी MEMS, नॅनोटेक्नॉलॉजी, रीयूजेबल एरोस्पेस व्हेइकल्स, भविष्यातील ऊर्जा प्रणाली, रिमोट सेन्सिंग, आपत्ती व्यवस्थापन, संचार नेटवर्क्स अशा अत्याधुनिक विषयांवर संशोधनाधारित प्रकल्प सादर केले.
रायगड जिल्ह्याचे कोकण विभागीय समन्वयक डॉ. संदीप दत्तात्रेय वारगे यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटाळे (रोहा) व मुरुड परिसरातील एकूण १२ विद्यार्थी या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले.
शालेय गटातील विद्यार्थ्यांनी “ASL ते स्पीच सेन्सिंग ग्लोव्ह” या अभिनव प्रकल्पाद्वारे संकेतभाषेचे ध्वनिरूपांतर करणारे यंत्र सादर केले. महाविद्यालयीन गटातून सादर झालेल्या “अंतराळ वेल्डिंगमधील सुधारणा” आणि “StarSilk” या संशोधन कल्पनांनी भविष्यातील अंतराळतंत्रज्ञानातील नवी दिशा दर्शवली.
प्रकल्पांचे परीक्षण ISRO चे वरिष्ठ वैज्ञानिक आणि भारत सरकारचे नामांकित विद्यापीठ तज्ज्ञ यांच्या समितीने केले. निवड प्रक्रियेतून शालेय व महाविद्यालयीन गटातील प्रत्येकी २० विद्यार्थी अंतिम फेरीस पात्र ठरले.
यामध्ये विशेष ठरले युनिव्हर्सल ए.आय. युनिव्हर्सिटी, कर्जत येथील द्वितीय वर्षाचे विद्यार्थी अवधूत संदीप वारगे, ज्यांनी “टॉप २०” मध्ये स्थान मिळवून रायगड जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान वाढवला.
सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रांचे वितरण डॉ. निगार शाजी (संचालक, आदित्य एल–१ मिशन) आणि डॉ. पी. वीरमुथुवेल (प्रोजेक्ट डायरेक्टर, चांद्रयान–३) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. संदीप दत्तात्रेय वारगे यांचाही विशेष सन्मान झाला.
कार्यक्रमास गुरुग्रामचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. अग्रवाल, तसेच केंद्र व राज्यातील विविध वैज्ञानिक आणि मान्यवर उपस्थित होते. राज्याच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्री मा. रक्षा निखिल खडसे यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीचे विशेष कौतुक केले.
अवधूत वारगे यांनी या यशाचे श्रेय आपल्या कॉलेज प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाला आणि वडील डॉ. संदीप वारगे यांच्या प्रेरणेला दिले. त्यांच्या दोन्ही पालकांचा व्यवसाय प्राथमिक शिक्षक असल्याने, हे यश ग्रामीण शैक्षणिक पायावर उभ्या नवयुगातील विज्ञानप्रेरणेला अधोरेखित करते.
या अधिवेशनाचे आयोजन मिलिंद चौधरी (जनरल सेक्रेटरी) यांच्या नेतृत्वाखाली झाले असून, डॉ. कलाम यांच्या कुटुंबीयांसह डॉ. दिलीप देशमुख, राहुल शहा, विद्या मुथूवल, डॉ. कृष्णा सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button