ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
उष्णतेच्या तीव्र लाटेत खाजगी शाळांची घाई; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू?
महिला व बालविकास मंत्री, जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित शाळांना आदेश द्यावेत, अन्यथा कारवाई करावी, अशी पालकांची मागणी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
राज्यात मान्सूनचे आगमन लांबले असून उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत काही खाजगी शाळांनी ८ जूनपासून शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय संतापजनक असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे.
सध्या अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चढलेला असताना लहान विद्यार्थ्यांना भर उन्हात शाळेत पाठविण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, असा सवाल पालक उपस्थित करत आहेत. सकाळपासूनच अंगाची लाही लाही करणारे ऊन, उकाडा आणि दमट हवामान यामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर आरोग्यविषयक समस्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे, हवामानातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने आणि प्रशासनाने वेळोवेळी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असताना काही खाजगी शाळांकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा शाळा सुरू करण्याची घाई का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
पालकांनी या निर्णयाला “मनमानी” ठरवत तीव्र नाराजी व्यक्त केली असून विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.
शिक्षण विभागाने राज्यातील सर्व विभागांसाठी एकसमान वेळापत्रक लागू करून १५ जूनपासून नियमित अध्यापन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने शाळा सुरू करण्यासाठी १५ जूनची तारीख निश्चित केलेली असताना काही खाजगी शाळांकडून ८ जूनपासूनच शाळा सुरू करण्याची घाई सुरू आहे. मान्सून अद्याप दाखल झालेला नाही, तापमानाचा पारा चढलेला आहे आणि प्रशासन नागरिकांना उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन करत आहे. अशा वेळी सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना भर उन्हात शाळेत बोलावणे हे शैक्षणिक बांधिलकीचे नव्हे तर असंवेदनशीलतेचे लक्षण असल्याची भावना पालक व्यक्त करत आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा नियम आणि नफ्याला अधिक महत्त्व देणाऱ्या शाळा व्यवस्थापनांनी एकदा तरी वातानुकूलित कार्यालयातून बाहेर पडून उन्हात प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था पाहावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून घेतलेले निर्णय भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकतात, याची जाणीव आता तरी संबंधित शाळांनी ठेवणे गरजेचे आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय तत्काळ स्थगित करावा आणि मान्सून दाखल होईपर्यंत अथवा वातावरणात सुधारणा होईपर्यंत शाळांना उशिराने सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.
महिला व बाल विकास मंत्री, शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणारा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
……




