ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

कार्यकर्त्यांच्या जोरावरच विजयाचा मार्ग- एडवोकेट अंकित बंगेरा 

पेणमध्ये ‘बूथ लेव्हल मॅनेजमेंट कार्यशाळा संपन्न, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग  |
कार्यकर्त्यांच्या जोरावरच पक्ष उभा राहतो आणि त्यांच्या ऊर्जा व समर्पणातूनच विजयाचा मार्ग तयार होतो. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ‘बूथ लेव्हल मॅनेजमेंट’ अशा कार्यशाळा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात, असे ठाम मत भाजपाचे अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक अ‍ॅड. अंकित बंगेरा यांनी व्यक्त केले.
पेण येथे आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ कार्यशाळेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यशाळेला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अ‍ॅड. बंगेरा यांनी बूथ स्तरावरील व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, निवडणुकीतील यशाचा पाया हा मजबूत बूथ रचनेवर अवलंबून असतो. प्रत्येक बूथ सक्षम आणि सक्रिय असेल, तर संपूर्ण संघटन आपोआप बळकट होते. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि योग्य वेळी नियोजनबद्ध काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, मतदार यादीचे सूक्ष्म विश्लेषण, प्रभावी संवाद कौशल्य, घराघरात संपर्क मोहीम आणि बूथ समित्यांचे सशक्तीकरण यावर त्यांनी विशेष भर दिला. कार्यकर्त्यांमधील समन्वय, शिस्त आणि नियोजन यामुळेच निवडणुकीत यश मिळवता येते, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यशाळेदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला असून, या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होऊन आगामी निवडणुकांसाठी संघटन अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Back to top button