ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

सलमान कनेक्शन ठरले टायगरसाठी ‘टार्गेट’? टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार; बिश्नोई गँगचा कथित इशारा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
मुंबई |
अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर रविवारी सायंकाळी मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. फुटबॉल खेळून घरी परतत असताना पुष्पा पार्क परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी टायगरच्या कारवर गोळीबार केला. सुदैवाने टायगर श्रॉफ या हल्ल्यात सुरक्षित बचावला. मात्र त्याचा चालक आणि एका रिक्षाचालकाला दुखापत झाली असून चालकाला उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा दावा आणि हल्ल्यामागील नेमका सूत्रधार याबाबत मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. मुंबई क्राइम ब्रँचने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, हल्लेखोरांची हालचाल आणि इतर पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे.
या हल्ल्यानंतर बिश्नोई गँगचा सलमान खानशी संबंधित कथित वैर आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. टायगर श्रॉफ आणि सलमान खान यांच्यातील मैत्री आणि जवळीक यामुळे टायगरला लक्ष्य करण्यात आले का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र टायगरवरील हल्ल्याचे कारण म्हणून हा संबंध पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे स्पष्ट केलेला नाही.
बिश्नोई गँगशी संबंधित घटनांचा मागोवा घेतला असता, १४ एप्रिल २०२४ रोजी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन मोटारसायकलस्वारांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा दावा केला आहे.
यानंतर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या झाली. या प्रकरणातील आरोपींचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडला गेला असून, याच प्रकरणातील आरोपी शुभम लोणकरचे नाव पुढे रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराच्या तपासातही समोर आले.
१ फेब्रुवारी २०२६ रोजी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर पाच राऊंड गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नव्हती. सोशल मीडिया अकाउंटवरून बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. तपासात बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकरचे नाव समोर आले आणि या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली.
मुंबई पोलिसांच्या तपासानुसार, रोहित शेट्टी यांना सलमान खानशी असलेल्या जवळिकीमुळे लक्ष्य करण्यात आल्याचा निष्कर्ष तपासात मांडण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात मोठ्या कटाचा तपास केला आहे.
सलमान खानवरील गोळीबार, बाबा सिद्दीकी हत्या, रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबार आणि आता टायगर श्रॉफच्या कारवर झालेला हल्ला या घटनांमुळे बॉलिवूड आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमधील कथित संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे. टायगरवरील हल्ल्यामागे नेमके कारण काय आणि हल्लेखोरांचे बिश्नोई गँगशी प्रत्यक्ष संबंध आहेत का, हे आता पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, टायगर श्रॉफ सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी मुंबईतील सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीरपणे उपस्थित झाला आहे.
…….

Related Articles

Back to top button