ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
सहा महिन्यांत रायगड जिल्हा बँकेच्या व्यवसायात १,२६२ कोटींची वाढ; ६६व्या वर्धापनदिनानिमित्त ८,३६७ कोटींचा व्यवसाय
१० हजार कोटींच्या टप्प्याकडे वाटचाल, पनवेलमध्ये स्वतंत्र मार्केटिंग विभाग

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६६ वर्षांचा विश्वासाचा प्रवास पूर्ण करताना व्यवसायवाढीतही वेग कायम ठेवला आहे. बँकेच्या व्यवसायात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत १,२६२.४३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२६ रोजी ७,१०५.१४ कोटी रुपये असलेला बँकेचा व्यवसाय ३० सप्टेंबरअखेर ८,३६७.५७ कोटी रुपयांवर पोहोचला. या कालावधीत बँकेने ७०.२५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा नोंदविला आहे. आता १० हजार कोटींच्या व्यवसायाच्या टप्प्यापासून बँक सुमारे १,६३२ कोटी रुपये दूर आहे.
बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली बँकेच्या कामकाजात आधुनिक बँकिंग तंत्रज्ञान, ग्राहकसेवा आणि कर्जप्रक्रिया सुलभ करण्यावर भर दिला जात असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. व्यवसायवाढीबरोबरच वसुली आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यावरही शाखास्तरावर काम सुरू आहे.
३१ मार्चनंतर बँकेचा व्यवसाय ११ जुलै रोजी झालेल्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत ८ हजार कोटींच्या पुढे गेला होता. त्यानंतर सप्टेंबरअखेर त्यात आणखी वाढ झाली. व्यवसायवाढीचा हा आलेख कायम राहिल्यास पुढील काळात १० हजार कोटींचा टप्पा गाठण्याच्या दृष्टीने बँकेसमोर विस्ताराचे आव्हान राहणार आहे.
व्यवसायविस्ताराच्या दृष्टीने बँकेच्या संचालक मंडळाने स्वतंत्र मार्केटिंग विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागाचे प्रादेशिक कार्यालय पनवेल येथे सुरू करण्यात येणार आहे. नव्या ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचविणे आणि बाजारपेठेतील संधींचा अभ्यास करून व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करणे, अशी या विभागाची भूमिका राहणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या २०२६ मधील अंमलबजावणीत बँकेच्या ७,३४२ पात्र सभासदांचा दुसऱ्या व तिसऱ्या यादीत समावेश आहे. त्यापैकी ३,३९२ सभासदांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून त्यांच्या खात्यात २०.४६ कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र सभासदांचे प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी शाखास्तरावर संपर्क सुरू आहे.
१९६० मध्ये स्थापन झालेल्या बँकेचा ६६वा वर्धापनदिन यंदा व्यवसायातील या वाढीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. कृषी, सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित बँकेच्या पारंपरिक कामकाजासोबतच आता पनवेलमधील प्रस्तावित मार्केटिंग विभागाच्या माध्यमातून नव्या ग्राहकवर्गावर लक्ष केंद्रित करण्याची तयारी सुरू झाली आहे.
…..

““६६ वर्षांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रगती ही रायगड जिल्हा बँकेची खरी ओळख आहे.
बदलत्या काळानुसार आधुनिक बँकिंग आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आला आहे. व्यवसायातील वाढ ही सभासद, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागातून झालेली आहे. पुढील काळातही बँकेच्या सेवा अधिक प्रभावी करण्यावर भर राहील.”– जयंत पाटील, अध्यक्ष, आरडीसीसी बँक
……..

“ग्राहकसेवा गतिमान करणे, कर्जप्रक्रिया सुलभ करणे आणि वसुली प्रभावी करण्यावर भर आहे. शासकीय योजनांचा लाभ पात्र शेतकरी सभासदांना वेळेत मिळावा, यासाठी शाखास्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांचे योगदान बँकेच्या प्रगतीत महत्त्वाचे आहे.”– मंदार वर्तक, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरडीसीसी बँक
…….



