ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

ज्या हातांनी महाराष्ट्राला ‘पोषण’ दिले, त्या हातांचेही ‘सक्षमीकरण’!; आदिती तटकरे यांचा अंगणवाडीसाठी दुहेरी अजेंडा

अंगणवाड्यांना सुविधांचे बळ देतानाच सेविका-मदतनीसांच्या ग्रॅज्युइटीसाठी शासन सकारात्मक; मुंबईतील ८१७ अंगणवाड्या होणार सक्षम


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
मुंबई  |
बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांपर्यंत पोषण व आरोग्याच्या योजना पोहोचविणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या सक्षमीकरणावरही आता भर देण्यात येणार आहे. एका बाजूला अंगणवाडी केंद्रांचा चेहरामोहरा बदलताना दुसऱ्या बाजूला सेविका-मदतनीसांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ग्रॅज्युइटीचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ९व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ तटकरे यांच्या हस्ते झाला. यंदाचा पोषण माह ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित असून, अंगणवाडीला केवळ पोषण आहाराचे केंद्र न ठेवता आरोग्य, पोषण आणि जनजागृतीचे सक्षम केंद्र बनविण्याचा प्रयत्न आहे.
सेविका आणि मदतनीसांच्या माध्यमातून पोषण अभियानाचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो. त्यामुळे त्यांच्या कामाला अधिक बळ देतानाच उपदान अर्थात ग्रॅज्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
सक्षम अंगणवाडी प्रकल्पाअंतर्गत स्नेहा सामाजिक संस्था आणि एकात्मिक बालविकास सेवा यांच्यात करार करण्यात आला. त्यानुसार मुंबईतील ८१७ अंगणवाड्या आवश्यक सुविधांनी सुसज्ज करून सक्षम केल्या जाणार आहेत.
दरम्यान, अंगणवाडीतील डिजिटल स्क्रीनवर आयुष विभागाने तयार केलेले आरोग्य व पोषणविषयक व्हिडिओ नियमित दाखविण्याची सूचना तटकरे यांनी केली. आयुष विभागाच्या माध्यमातून सेविका-मदतनीसांना शिशु अभ्यंग व बालकांच्या काळजीबाबत मार्गदर्शन देऊन ही माहिती मातांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
पोषण माहाच्या माध्यमातून महिला व बालविकास, आरोग्य आणि आयुष विभागाने समन्वयाने काम करण्याची गरजही तटकरे यांनी व्यक्त केली. यावेळी एकात्मिक बालविकास सेवेचा लोगो, वेबपेज आणि ‘पोषण आहार प्रार्थने’चे उद्घाटन करण्यात आले.
गेल्या वर्षीच्या पोषण माहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वर्धा, हिंगोली आणि नागपूर जिल्ह्यांचा, तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या वर्धा, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यांचा गौरव करण्यात आला. प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचाही सन्मान करण्यात आला.
दरम्यान, लेक लाडकी योजनेचा लाभ आता डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असून, यावेळी तीन लाभार्थ्यांना लाभाच्या रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले.
अंगणवाडी केंद्रांना सुविधा देण्यासोबतच ती व्यवस्था उभी करणाऱ्या सेविका-मदतनीसांच्या भविष्याचा प्रश्नही हाताळण्याचा दुहेरी दृष्टिकोन तटकरे यांच्या भूमिकेतून पुढे आला आहे.

Related Articles

Back to top button