ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“अलिबागची हद्द वाढली तर त्यांचं राजकारण अंधारात जाईल — म्हणूनच शेकापनं शहराच्या विकासाचा गळा दाबून स्वतःच्या खुर्चीभोवती कुंपण उभं केलं!”
भाजपचे रायगड जिल्हा निवडणूक प्रमुख सतीश धारप यांचा पत्रकार परिषद शेकापवर हल्लाबोल

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : अलिबागकरांचं भविष्य, शहराचा विकास, मुलभूत सुविधा, वाढती लोकसंख्या यातील काहीच महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय? तर स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवणं! हद्दवाढ झाली तर समीकरण बदलतील, सत्ता हातातून जाईल आणि दशकानुदशकं जपलेलं वर्चस्व संपेल. या भीतीने अलिबागच्या विकासाचा गळा आवळून स्वतःच्या खुर्ची भोवती कुंपण घालून ते सुरक्षित करण्यात आला, असा थेट नाव न घेता पण नेम धरून केलेला आरोप भाजपचे रायगड जिल्हा निवडणूक प्रमुख सतीश धारप यांनी केला आहे.
भाजपा – शिवसेना युतीने पत्रकार परिषदेत घेऊन अलिबागच्या राजकारणात अक्षरशः खळबळ उडून दिली आहे.

“अलिबाग थांबवलं गेलं आहे विकासासाठी नाही, तर एका पक्षाचा राजकीय श्वासोच्छ्वास टिकवण्यासाठी!”, असा स्फोटक दावा भाजपचे सतिश धारप यांनी केला. त्यांनी स्पष्ट केले की ही निवडणूक केवळ सत्ता बदलाची नाही, तर वर्षानुवर्षे कृत्रिमरित्या रोखलेल्या वाढीव अलिबागची मुक्तता आहे.
हद्दवाढ रोखली कारण सत्ता धोक्यात येणार होती — भाजपचा ,सरळ आणि थेट आरोप!
विकासाची कामं सुरू करण्यासाठी हद्दवाढ आवश्यक आहे, हे प्रशासन, अधिकारी, नागरिक आणि तज्ज्ञ सगळे सांगत आहेत. पण तरीही अलिबागची हद्द वाढवली गेली नाही. कारण ती वाढली असती तर शेकापच्या राजकारणाचा पाया हादरला असता, असा आरोप युतीने केला आहे.
भाजपचे निवडणूक प्रमुख सतिश धारप म्हणाले, “दशकानुदशकं अलिबागच्या भविष्यावर राजकीय कुलूप ठेवलं गेलं. शहर वाढू नये म्हणून संपूर्ण व्यवस्था थांबवली गेली. हे ‘विकास रोखण्याचं’ नव्हतं, हे ‘लोकशाही थांबवण्याचं’ षडयंत्र होतं!”

५ वर्षांची घरपट्टी माफ — घोषणाच नाही, ‘राजकीय जवाबदारी’ : युती
या सगळ्यात सर्वात मोठी घोषणा त्यांनी केली. निवासी घरांची ५ वर्षांची घरपट्टी सरसकट माफ करण्यात येईल. हा निवडणुकीचा जुमला नाही तर वर्षानुवर्षे विकास न मिळालेल्या अलिबागकरांची नुकसानभरपाई आहे, असं भाजपानं स्पष्ट केलं आहे.
धारप म्हणाले, “शहर वाढलं नाही, सुविधा मिळाल्या नाहीत, आणि तरीही अलिबागकरांनी कर भरायचा? हा अन्याय आहे आणि आम्ही तो संपवू!”
युती सत्तेत आली तर पहिल्याच सभेत हा ठराव मांडला जाईल, असा दावा करण्यात आला.
एकाच घरातील सत्ता उलटवण्यासाठीची योग्य संधी
‘एकाच घरातील सत्ता’ संपवण्याची हिच योग्य वेळ असून धारप पुढे म्हणाले, “अलिबागमध्ये एकाच घरातील सत्ता बसून शहरी विकासाचा गळा घोटत होती. आता अलिबागकर उठले आहेत. या वेळी निवडणूक नाही तर हा बंड आहे!”
अलिबाग एकतर वाढेल किंवा परत तेच चालू राहील. निवडणुकीत सत्ता कोणाला द्यायची याची सर्वस्वी जबाबदारी आता नागरिकांचीच आहे.
युतीने स्पष्ट केलं, हद्दवाढ, वाढता महसूल, मूलभूत सुविधा आणि घरपट्टी माफी हे चार मुद्दे आता घोषणापत्र नाही तर युतीने ते थेट युद्धरेषेवर घेतले आहेत.
धारप शेवटी म्हणाले, “अलिबाग आता दोन दिशांना उभं आहे. एका दिशेला विकास, दुसऱ्या दिशेला स्थिरावलेली सत्ता. आता अलिबागकरांनी ठरवायचं आहे, शहर वाढवायचं की काही लोकांचं अस्तित्व जपण्यासाठी ते पुढची १० वर्षं थांबवायचं?”
याप्रसंगी पत्रकार परिषदेस आस्वाद पाटील, ऍड.महेश मोहिते, चित्रा पाटील, गिरीश तुळपुळे, उदय जोशी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तनुजा पेरेकर, नगरसेवक पदाचे उमेदवार एडवोकेट अंकित बंगेरा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
……




