ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

‘एक दिवसाची मोहीम नव्हे… दर शनिवारी कृती’; अलिबागमध्ये स्वच्छतेची नवी कार्यसंस्कृती

नगराध्यक्षा अक्षया नाईक व उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांचा पुढाकार; प्रत्येक आठवड्यात एका विभागात विशेष स्वच्छता अभियान


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग |

स्वच्छतेसाठी एखादा दिवस साजरा करून मोहीम संपविण्याऐवजी, ती नगरपरिषदेच्या साप्ताहिक कामकाजाचा कायमस्वरूपी भाग बनविण्याचा निर्णय अलिबाग नगरपरिषदेत घेण्यात आला आहे. नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्या पुढाकारातून दर शनिवारी शहरातील एका विभागात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, स्वच्छता हा “कार्यक्रम” नव्हे तर “कार्यसंस्कृती” बनविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

शनिवारी या उपक्रमाच्या माध्यमातून अलिबाग बीच, महावीर चौक ते पी.एन.पी. मच्छी मार्केट परिसराची स्वछता करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत परिसराची साफसफाई केली.

नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी शहराच्या प्रत्येक प्रभागात नियोजनबद्ध पद्धतीने स्वच्छता अभियान राबविले जाईल, असे सांगत नागरिकांनीही आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. पर्यटननगरी अलिबागची स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन ही नगरपरिषदेची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी या अभियानातून नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. स्वच्छतेबाबत जनजागृती, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक सवयी यासाठी सातत्याने उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.
या मोहिमेत नगरसेविका ॲड. अश्विनी ठोसर, नगरसेवक ॲड. ऋषिकेश माळी, नगरसेवक जमालुद्दीन सय्यद, मुख्याधिकारी सागर साळुंखे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.


Related Articles

Back to top button