ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
मळलेला चेहरा धुण्याऐवजी; आरसा पुसण्यासाठी कोट्यवधींची सौंदर्यप्रसाधने?
दुभाजकांवरील फॅन्सी रिफ्लेक्टरवर १.९० कोटी खर्च; तरीही आणखी ९० लाख खर्चाचा प्रस्ताव, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
अलिबाग शहरातील वाहतूक बेटे, समुद्रकिनारा आणि रस्त्यांच्या दुभाजकांवर करण्यात आलेले फॅन्सी लाईट्स व रिफ्लेक्टरचे काम म्हणजे शहराच्या खऱ्या समस्या बाजूला ठेवून केवळ वरवरचा देखावा करण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका नगरसेवक ॲड. अंकित बंगेरा यांनी केली आहे. शहरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कोट्यवधी रुपये सौंदर्यीकरणावर खर्च करणे म्हणजे मळलेला चेहरा धुण्याऐवजी आरसा पुसण्यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधने वापरण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ॲड. अंकित बंगेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग नगरपालिकेकडून शहरातील काही वाहतूक बेटे, रस्ते दुभाजक तसेच समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात फॅन्सी रिफ्लेक्टर आणि लाईट्स बसविण्यात आले आहेत. या कामासाठी आतापर्यंत सुमारे १ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात आले असून एवढा मोठा निधी खर्च करूनही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या रिफ्लेक्टरची अवस्था समाधानकारक नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
“ज्या रिफ्लेक्टरवर कोट्यवधी रुपये खर्च झाले, ते अनेक ठिकाणी आधीच फुटलेले किंवा बंद अवस्थेत दिसतात. काही ठिकाणी ते व्यवस्थित कार्यरत नाहीत. एवढ्या मोठ्या खर्चानंतरही काही महिन्यांतच ही अवस्था निर्माण होणे हे कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे,” असे ॲड. अंकित बंगेरा यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शहरातील अनेक दुभाजकांवरील रिफ्लेक्टरवर माती, धूळ, सिमेंट आणि डांबराचे थर साचलेले दिसत आहेत. “सौंदर्यीकरणाच्या नावाखाली बसविलेल्या या यंत्रणेची योग्य देखभाल आणि स्वच्छता केली जात नसल्याने त्यांचा प्रत्यक्ष उपयोग कमी होत आहे. अशा सुविधा उभारण्याइतकेच त्यांचे नियमित मेंटेनन्स करणेही महत्त्वाचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
“अलिबाग ही पर्यटननगरी असली तरी शहरातील भाजी मार्केट परिसरातील अस्वच्छता, अनधिकृत हातगाड्या, प्लास्टिक बंदीची अपुरी अंमलबजावणी, वाहतूक कोंडी अशा अनेक मूलभूत समस्या अद्याप कायम आहेत. या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी दुभाजकांवर केवळ सजावटीच्या कामांवर भर दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे,” अशी टीकाही ॲड. अंकित बंगेरा यांनी केली.
“फॅन्सी रिफ्लेक्टर हे जरी शहराच्या सौंदर्यात भर घालू शकतात, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी त्यांची गुणवत्ता समाधानकारक नाही. काही रिफ्लेक्टर फुटलेले आहेत, तर अनेक बंद अवस्थेत आहेत. त्यावर माती, धूळ, सिमेंट आणि डांबराचे थर साचलेले दिसतात. त्यामुळे त्यांची नियमित स्वच्छता आणि देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे. आधीच या कामावर सुमारे एक कोटी ९० लाख रुपये खर्च झाले असताना आता त्यासाठी आणखी ९० लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव असल्याने या संपूर्ण खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे,” अशी माहिती नगरसेवक ॲड. अंकित बंगेरा यांनी दिली.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी सांगितले की, शहरातील वाहतूक बेटे व रस्ता दुभाजकांवर बसविण्यात आलेल्या फॅन्सी रिफ्लेक्टर व लाईट्सचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. काही ठिकाणी दिसून येणाऱ्या त्रुटी दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या असून खराब किंवा बंद पडलेले रिफ्लेक्टर दुरुस्त करून संपूर्ण प्रकल्प लवकरच व्यवस्थित कार्यान्वित करण्यात येईल.

………
सत्ताधाऱ्यांचे म्हणणे काय?
……..
फॅन्सी रिफ्लेक्टर आणि लाईट्सचे काम सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात झालेले नसून ते अलिबाग नगरपालिकेतील प्रशासकीय राजवटीत मंजूर होऊन राबविण्यात आलेले प्रकल्प असल्याचा ठाम दावा उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांनी सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमशी बोलताना केला. राज्य आणि केंद्र सरकारच्या स्तरावरून अशा प्रकारच्या योजना मंजूर होत असतात आणि त्यामध्ये निधीची तरतूद, ठेकेदारांची नियुक्ती तसेच संपूर्ण कामाचा आराखडा एकत्रित स्वरूपात दिला जातो. त्या माध्यमातूनच ही कामे करण्यात आली असून या प्रकरणाचा सध्याच्या शेकाप सत्ताधाऱ्यांशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याआधी कार्यरत असलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत ही कामे मंजूर व पूर्ण झाली असल्याचे सांगत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जनतेच्या पैशांची उधळपट्टी कोणी केली याचा शोध घेतला जाईल आणि त्याचा सर्व तपशील पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर मांडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यापुढे बोलताना ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या की, फॅन्सी रिफ्लेक्टर आणि लाईट्सच्या कामाबाबत काही नगरसेवकांकडून आक्षेप घेतले जात आहेत. त्यांच्या टीकेमागे काही मुद्दे असू शकतात; मात्र त्यांच्याकडे संपूर्ण माहिती नसल्याचे दिसून येते. विषयाची पूर्ण माहिती घेऊन आरोप केले असते तर अधिक योग्य ठरले असते, असा टोला त्यांनी लगावला. संबंधित कामाबाबतची वस्तुस्थिती आणि संपूर्ण कागदपत्रे लवकरच पत्रकार परिषदेत उघड करण्यात येतील, असेही त्यांनी सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमशी बोलताना स्पष्ट केले.
…..




