ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“काळा दिवस कोणासाठी? भाजप-राष्ट्रवादीसाठी हा सुराज्याचा ‘पांढरा दिवस’ – तटकरे”
समाजमाध्यमांवरील पोस्टबाबत तटकरे अनभिज्ञ निवडणूकपूर्व युतीला जनतेचे बहुमत; महायुतीच्या निर्णयामुळे शिवसेना सत्तेत

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेनंतर शिवसेनेला अपेक्षित सत्तावाटप न मिळाल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेचा दिवस हा “काळा दिवस” असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना खासदार सुनील तटकरे यांनी हा काळा दिवस नेमका कोणासाठी आहे हे मला माहिती नसल्याचे सांगितले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची निवडणूकपूर्व युती होती आणि जनतेने आम्हाला निवडून दिले. त्यामुळे लोकशाही मार्गाने सत्ता स्थापनेचा अधिकार आमच्याकडे होता. मात्र महायुतीच्या निर्णयामुळे शिवसेनाही सत्तेत सहभागी झाली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा दिवस सुराज्याचा “पांढरा दिवस” असून जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या विविध प्रश्न बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
तटकरे म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत पदाधिकारी आणि प्रशासन ही दोन्ही चाके महत्त्वाची आहेत. पदाधिकारी नसतील तर प्रशासन आपापल्या पद्धतीने काम करू लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार संसदीय लोकशाही पद्धतीत जनतेला कोण सत्तेत यावे हे ठरवण्याचा अधिकार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेकदा पक्ष वेगवेगळे लढतात. त्यानंतर व्यापक विचार करून एकत्र येण्याचे निर्णय घेतले जातात. जिल्ह्याच्या हितासाठी निर्णय घेण्याचा अधिकार पदाधिकाऱ्यांना असतो, असेही त्यांनी नमूद केले.
निवडणुकीनंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी संपर्क साधला होता का, या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले की, माझ्याशी कोणताही औपचारिक संपर्क झाला नाही. प्रत्येक पक्षाला आपले धोरण ठरवण्याचा अधिकार आहे.
राजकारणात बदलत्या परिस्थितीनुसार अनेक घडामोडी होत असतात. माझ्या ४० वर्षांच्या राजकीय प्रवासात अनेकदा पक्षांमध्ये संघर्ष आणि संवाद दोन्ही झाले आहेत. राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर मतभेद असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगळे निर्णय घेतले जातात, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत १२ जिल्हा परिषदांमध्ये समन्वयाने काम करण्याचा निर्णय झाला होता. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीनंतर विशेष समित्यांच्या निवडणुकीवेळी सत्तावाटपाबाबत पुढील चर्चा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत माहिती देताना तटकरे म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव-इंदापूर परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने बायपासचे काम सुरू आहे. कोकण रेल्वे, वनविभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या तांत्रिक अडचणींमुळे कामाचा वेग मंदावला होता. यासंदर्भात कोकण रेल्वेचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
काही तांत्रिक अडचणी दोन दिवसांत, काही १५ दिवसांत, तर उर्वरित अडचणी एका महिन्यात दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिस्थिती अनुकूल राहिल्यास १ जूनपर्यंत वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
रिलायन्सच्या विस्तारीकरणामुळे भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला असून त्याबाबतही बैठक घेण्यात आली. तसेच गेल (GAIL) चा उसर परिसरातील महत्वाकांक्षी प्रकल्प आणि स्थानिक ग्रामस्थांच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.
याशिवाय सागरी महामार्ग प्रकल्पातील भूसंपादनाच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकारी, प्रकल्प प्राधिकरण आणि स्थानिक नागरिकांची बैठक घेण्यात आली असून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवून काम गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत प्रशासकीय इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यात आला असून काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच दादर गावातील जमीन संपादन आणि पाणीपुरवठा योजनेत मोठा खर्च होऊनही पाणी पोहोचले नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. निधी उपलब्धतेसाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून केंद्र सरकारचे मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारला पत्र देणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.




