ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
“चांद्रयानाने चंद्र जिंकला, पण मुंबई–गोवा महामार्गाचं मिशन अजून ‘फेल-ऑर्बिट’मध्ये!” मुंबई–गोवा महामार्गासाठी गडकरींची ‘नवीन डेडलाईन’ही कक्षेत हरवणार?”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
नवी दिल्ली : मुंबई–गोवा महामार्गाचं स्वप्न कोकणाला दाखवून पंधरा वर्षं उलटली, खर्च चांद्रयान मोहिमेपेक्षा जास्त, कंत्राटदार बदलले, चौकशा झाल्या… पण रस्ता मात्र आजतागायत पूर्ण नाही! याच अधांतरी प्रकल्पाबद्दल लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाच जाब विचारला आणि त्यांनीही यावेळी चुक कबूल करत नवीन डेडलाईन दिली.

लोकसभेत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी टोकदार प्रश्न उपस्थित करत गडकरींना सरळ विचारलं, “किती वर्षं अजून वाट पाहायची? चंद्रावर जाण्यापेक्षा जास्त पैसा रस्त्यावर खर्च झाला, तरीही महामार्ग पूर्ण नाही. नागरिक वैतागलेत हा रस्ता कधी तयार होणार?”
सावंत यांच्या या सरळ प्रश्नानं सभागृहात क्षणभर शांतता पसरली. त्यावर नितीन गडकरींना उत्तर द्यावेच लागले. गडकरींची कबुली “प्रकल्प रेंगाळला, मान्य करतो!”

गडकरी म्हणाले, “मुंबई–गोवा महामार्ग प्रकल्प २००९ पासून रेंगाळलाय.” जमीन संपादन, कंत्राटदारांचे अकार्यक्षम काम, कारवाया… या सर्वामुळे विलंब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“८९% काम पूर्ण झाले आहे.”, “एप्रिल २०२६ पूर्वी संपूर्ण महामार्ग पूर्ण होईल.” परंतु सर्वाधिक चर्चेत राहिलं ते त्यांचं स्पष्ट वक्तव्य, “प्रकल्प खूप रेंगाळला, हे मान्य करतो.” ही थेट कबुली, तीही सभागृहात, कोकणवासीयांचा संताप अधिकच वाढवणारी ठरली आहे. कारण १५ वर्षांपासून ‘लवकरच रस्ता तयार होईल’ अशा आश्वासनांवर नागरिकांची आशा–निराशेची साखळी सुरूच आहे.

कोकणाचा प्रश्न – “डेडलाइन बदलत राहणार, की यावेळी खरंच रस्ता मिळणार?”
एप्रिल २०२६ ही गडकरींची नवी डेडलाइन.
पण कोकण व मुंबईकरांचा प्रश्न स्पष्ट आहे की “मोठी भाषणं, मोठे खर्च… पण रस्ता कधी? आणि जबाबदार कोण?” वर्षानुवर्षे रखडलेल्या या महामार्गाने विकासाच्या गाडीलाच ब्रेक लावलेत. आता कोकणवासीय एकच मागणी करत आहेत, “डेडलाइन नव्हे, आता रस्त्याचे काम संपूर्ण पूर्ण करा”.




