अजित पवारांच्या विधानाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाठराखण — “उद्देश मतदानाचे महत्त्व पटवणे”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या विधानावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. मतदान आणि निधी यासंदर्भातील अजित पवारांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले असताना, उपमुख्यमंत्र्यांनी “अजितदादांचा उद्देश तसा नाही” इतक्याच सरळ शब्दांत त्यांची पाठराखण केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अजित पवारांनी “मतदान केले नाही तर निधी नाही” असे जाहीर केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यावर आमदार शशिकांत शिंदेंनी तीव्र नाराजी व्यक्त करत “हा निधी काय त्यांच्या बापाचा आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला होता.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,
“राज्याची तिजोरी ही जनतेची असून आम्ही सर्वजण फक्त तिचे विश्वस्त आहोत. अजितदादांच्या विधानामागचा उद्देश मतदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा होता. त्यामुळे त्या विधानाचा चुकीचा अर्थ लावू नये.”
दरम्यान, नाशिक कुंभमेळ्याच्या कामांसाठी प्रस्तावित वृक्षतोडीच्या विषयावरही भाष्य करताना शिंदे यांनी सांगितले की, “या प्रकरणाची मी माहिती घेत आहे. राज्य सरकारने आजवर कोणताही पर्यावरणाला हानीकारक निर्णय घेतलेला नाही. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे ही सरकारची प्राथमिकता आहे आणि पुढेही राहील.”
अभिनेते सयाजी शिंदे आणि पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाला विरोध दर्शवला असला तरी, सरकार संवेदनशील पद्धतीने आणि अभ्यासपूर्वकच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




