ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“मतांच्या पलीकडे मिशन विकास!”–शहापूरच्या गल्ली-गल्लीत राष्ट्रवादीचा प्रचार उफाळला अमित नाईक, वैभव पाटील यांना पाठिंबा वाढला


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग
शहापूर मतदारसंघात बारामतीच्या धर्तीवर सर्वांगीण विकास घडवण्याचा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष व जिल्हा परिषद गट क्र. ३० चे उमेदवार अमित नाईक यांनी आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. “उद्या निवडणूक लागली आणि आज फिरायचं” अशा संधीसाधू राजकारणावर टीका करत, गेल्या २५ वर्षांपासून समाजकारणातूनच राजकारण घडवत असल्याचा दावा त्यांनी केला.
सारळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून ते विधानसभा अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास करत त्यांनी माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांच्याकडून घेतलेल्या धड्यांवर आधारलेले “९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण” हे सूत्र जनतेसमोर मांडले.
खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विकासकामे, युवकांचे संघटन, तसेच कला व क्रीडा क्षेत्रातील तरुणांना व्यासपीठ देण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत असल्याचे नाईक यांनी सांगितले. शहापूर मतदारसंघातील बहुतांश गावे खारेपाट भागात येत असल्याने समुद्राचे पाणी शेतात घुसून भातशेती उद्ध्वस्त होत असून पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि तरुणांच्या हाताला रोजगार नसणे ही मोठी समस्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “गावकऱ्यांच्या हिताचा, पर्यावरणपूरक आणि रोजगारनिर्मिती करणारा प्रकल्प असेल, तर त्याला विरोध न करता पाठिंबा देणार,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
आरोग्य सुविधांचा अभावही गंभीर प्रश्न असल्याचे सांगत, शहापूर मतदारसंघात सर्व सोयींनी परिपूर्ण ‘अंशी’ येथे आरोग्य सेवा देणारे हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. हे काम खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विकास हाच निवडणुकीचा मुख्य मुद्दा असल्याचे सांगत, विरोधकांवर टीका करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यावर भर देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गट क्र. ३० चे उमेदवार अमित नाईक आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार वैभव वासुदेव पाटील यांनी ग्रुप ग्रामपंचायत शहापूर, चरी, कुरकुंडी आणि कोलटेभी येथे प्रचार केला. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत प्रचार करण्यात आला. या वेळी शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रचारादरम्यान पाणी, रस्ते, रोजगार आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत, मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्याचा निर्धार वैभव पाटील यांनी व्यक्त केला. शहापूर, चरी, कुरकुंडी आणि कोलटेभी परिसरातील जनतेकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शहापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला आघाडी मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Related Articles

Back to top button