क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
क्रीडा मंत्र्याकडून संयुक्ता व किमया कार्लेचा गौरव; महाराष्ट्राच्या कन्यांचा जागतिक डंका
१५० पदकांची ‘हिरकणी’ रिओत चमकणार; क्रीडा मंत्र्यांचा शुभेच्छा वर्षाव

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : महाराष्ट्राची उदयोन्मुख रिदमिक जिमनॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे हिची वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५, रिओ दि जानेरो (ब्राझील) स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दूरध्वनीवरून तिच्याशी संवाद साधत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या वेळी मंत्री कोकाटे यांनी संयुक्ताचा “महाराष्ट्राची हिरकणी” म्हणून गौरव करत तिच्या खिलाडूवृत्तीची प्रशंसा केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीनेही त्यांनी शुभेच्छा दिल्या. संयुक्ताच्या पालकांसोबतच प्रशिक्षक मानसी गावंडे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती पूजा सुर्वे यांचेही अभिनंदन करण्यात आले. खेळासाठी आवश्यक सुविधा, मदत अथवा मार्गदर्शन हवे असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन कोकाटे यांनी संयुक्ताला केले.
संयुक्ता ही या जागतिक स्पर्धेसाठी भारतातून निवड झालेली एकमेव जिमनॅस्ट असून वयाच्या पाचव्या वर्षापासून ठाण्यातील फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकादमी येथे ती प्रशिक्षण घेत आहे. आजवर तिने इंडिया युवा खेळ, राष्ट्रीय व इतर स्पर्धांमध्ये १५० पदके (यापैकी १२५ सुवर्ण) पटकावत आपली चमक सिद्ध केली आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने ७वा क्रमांक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारताच्या प्रशिक्षक म्हणून मानसी गावंडे यांची निवड झाली आहे.

किमया कार्लेचा ‘रिदमिकची किमयागार’ म्हणून गौरव
दरम्यान, नव्या ऑलिंपिक सायकलमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर २३ मार्क पार करणारी पहिली भारतीय जिमनॅस्ट ठरल्याबद्दल किमया कार्लेचंही मंत्री कोकाटे यांनी कौतुक केलं. रोमानियातील क्लुज-नापोका २०२५ क्लब स्पर्धेत किमयाने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. तिच्या कामगिरीवर आनंद व्यक्त करताना कोकाटे यांनी तिला “रिदमिकची किमयागार” अशी उपाधी बहाल केली.




