ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
गोकुळच्या सत्तेत शेकापची एंट्री; देवकरांच्या विजयातून सतेज पाटलांचा नवा ‘समविचारी फॉर्म्युला’!

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
कोल्हापूर |
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १६ जागा जिंकत सत्ता काबीज केली. मात्र या निकालातील वेगळा राजकीय संदेश ठरला तो शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सहचिटणीस बाबासाहेब विष्णू देवकर यांच्या विजयाचा. देवकर यांच्या रूपाने गोकुळच्या संचालक मंडळात शेकापची एंट्री झाली असून, सतेज पाटील यांच्या ‘समविचारी’ प्रयोगाला यामुळे नवा आयाम मिळाला आहे.
बाबासाहेब विष्णू देवकर यांनी १,७९४ मते मिळवत दणदणीत विजय नोंदवला. सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीतून निवडणूक लढवणाऱ्या देवकरांच्या विजयामुळे शेकापला गोकुळच्या संचालक मंडळात थेट प्रतिनिधित्व मिळाले आहे. शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील आणि राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. विशेष करून सतेज पाटील यांच्या रणनीतीचे त्यांनी कौतुक केले.
सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये देवकर यांना सर्वसाधारण गटातून उमेदवारी देण्यात आली होती. शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील प्रश्नांवर सक्रिय असलेल्या देवकरांनी विजय मिळवत संचालक मंडळात प्रवेश केला. शेकापने स्वतंत्र पॅनेल न उभारता समविचारी आघाडीच्या माध्यमातून गोकुळमध्ये प्रतिनिधित्व मिळवले, ही या निकालाची महत्त्वाची बाब ठरली आहे. या आघाडीत माजी खासदार राजू शेट्टी आणि गणपतराव पाटील यांच्यासह विविध समविचारी घटक सहभागी होते.
सतेज पाटील यांच्या आघाडीचे अभिजित प्रभाकर तायशेटे, शशिकांत पाटील चुयेकर, राहुल बजरंग देसाई, किसन बापूसो चौगले, बाबासाहेब श्रीपती चौगले, विद्याधर गुरबे, सचिन घोरपडे, विश्वजीत जाधव यांच्यासह देवकर विजयी झाले. महिला राखीव गटातून अंजना रेडेकर व भाग्यश्री डोंगळे, ओबीसीमधून शशिकांत खोत, अनुसूचित जातीमधून राजू बाबा आवळे आणि विमुक्त-भटक्या जमातीमधून बयाजी शेळके विजयी झाले. दुसरीकडे महायुतीला नऊ जागांवर समाधान मानावे लागले.
निवडणुकीत सतेज पाटील यांनी गोकुळची स्वायत्तता, दूध उत्पादकांचे प्रश्न आणि ‘गुजरात लॉबी’चा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. मात्र निकालात देवकरांचा विजय आणि त्यातून झालेली शेकापची एंट्री हीच आता सर्वाधिक चर्चेची बाब ठरली आहे. गोकुळमधील हा ‘समविचारी फॉर्म्युला’ आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही विस्तारतो का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
…..




