ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
पुस्तकातील अंतराळ संपले, प्रयोगशील शिक्षणाची इस्रोपर्यंत झेप! हटाळेच्या तीन विद्यार्थ्यांची श्रीहरिकोटाकडे वाटचाल; डॉ. संदीप वारगे यांच्या प्रयोगाशीलतेची कामगिरी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
पाठ्यपुस्तकातील ग्रह, तारे आणि रॉकेटची माहिती प्रत्यक्ष अनुभवात आणण्याचा प्रयोग हटाळे येथील जिल्हा परिषद शाळेने केला आणि त्याचे फलित थेट इस्रोपर्यंत पोहोचले आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव केंद्रांतर्गत रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, हटाळे येथील तीन विद्यार्थ्यांची श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राला भेट देण्यासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, ही निवड केवळ विद्यार्थ्यांच्या यशाची नव्हे, तर प्रयोगशील शिक्षणपद्धतीचीही मोठी पावती मानली जात आहे.
हटाळे शाळेतील नवनाथ महेंद्र भगत (इयत्ता सहावी), दक्ष संतोष नाईक (इयत्ता सहावी) आणि विराज संजय दिवटे (इयत्ता पाचवी) यांची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, रामेश्वरम यांच्या वतीने पुणे येथे आयोजित ‘कलाम स्टीम २०२६’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित यांची सांगड घालत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व नवसंशोधनाची जिज्ञासा निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक तथा नागाव केंद्रप्रमुख डॉ. संदीप दत्तात्रेय वारगे यांचा प्रयोगशील दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला आहे. शाळेत उभारलेले ‘फिरते तारांगण’, साडेनऊ फूट उंचीचे रॉकेट प्रतिरूप, विज्ञान-तंत्रज्ञानाधारित प्रयोग, STEM, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोडिंग यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान केवळ पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.
‘शाळेची भिंत ही स्वप्नांची मर्यादा नसते’ या विचारातून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देण्यात आली. त्यामुळे वर्गात पाहिलेले रॉकेट आता प्रत्यक्ष श्रीहरिकोटात पाहण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा समृद्धी संतोष नाईक, सरपंच हर्षदा मयेकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ, पालक, ग्रामस्थ तसेच शिक्षण विभागाने विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. पालक संतोष नाईक, महेंद्र भगत, संजय दिवटे तसेच शिक्षक सीमा नागावकर आणि विजया माळी यांचेही योगदान अधोरेखित होत आहे.
……



