ताज्या बातम्याक्रीडामहाराष्ट्रमुंबईरायगड
मोबाईलच्या स्क्रीनपासून जंक फूडच्या प्लेटपर्यंत… आता अक्षया नाईक यांचा पोषणाचा जागर!
राष्ट्रीय पोषण महाअभियानातून सात्त्विक आहाराने सुदृढ पिढी घडविण्याचा अलिबाग नगरपरिषदेचा संकल्प!

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
मोबाईलच्या स्क्रीनपासून फास्ट फूडच्या प्लेटपर्यंत बदललेल्या जीवनशैलीत मुलांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होत असताना पोषण आहार आणि सात्त्विक आहाराचे महत्त्व अधोरेखित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी केले.
राष्ट्रीय पोषण महाअभियान २०२६ अंतर्गत ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ‘निरोगी, सक्षम पिढीसाठी पोषण आहार’ हा संदेश देणारा कार्यक्रम अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने उर्दू शाळेमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी अंगणवाडी सेविका, कर्मचारी आणि लाभार्थ्यांच्या माध्यमातून पोषणाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.
“आज जंक फूडच्या जमान्यात पोषण आहार आणि सात्त्विक आहाराचे महत्त्व नव्याने सांगण्याची वेळ आली आहे. सुदृढ पिढी घडवायची असेल तर त्याची सुरुवात बालपणापासूनच झाली पाहिजे. मुलांना सकस, पौष्टिक आणि संतुलित आहार मिळणे ही केवळ कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.” असे अक्षया नाईक यांनी सांगितले.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोषणाचा संदेश पोहोचविणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. बालकांच्या आरोग्यासोबतच मातांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असून, पोषण ही भविष्यातील सक्षम समाजाची पायाभरणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांनीही पोषणाच्या संदेशाला व्यापक सामाजिक संदर्भ देताना सांगितले की, “सुदृढ बालक हा देशाचा पाया आहे. आजच्या कार्यक्रमातून पथनाट्याच्या माध्यमातून एक अत्यंत प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे. अशा उपक्रमांमधून सुदृढ समाज आणि पर्यायाने सुदृढ राष्ट्र घडण्यास मोठी मदत होते.”
बालक आणि मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने पोषणाचा संदेश आपल्या घरापासून समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी नीलम हजारे, अश्विनी ठोसर, निवेदिता वाघमारे, योजना पाटील, अनिल चोपडा, संतोष गुरव, जमाल सय्यद, ऋतुजा फुटाणे, प्रशासकीय अधिकारी श्रद्धा नवले, अंगणवाडी सुपरवायझर सोनाली धुमाळ यांच्यासह अंगणवाडी सेविका, कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…….




