ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड
राज्य पातळीवर ‘कस्तुरी’चा सुगंध दरवळला; अनुरागलाही युवा पुरस्काराने गौरवले

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : राज्य सांस्कृतिक पुरस्कारांत यंदाअलिबागचा जोरदार ठसा उमटला आहे. कस्तुरी देशपांडे-मांजरेकर आणि अनुराग गोडबोले या दोन अलिबागकरांनी राज्य पातळीवरील युवा पुरस्कार पटकावून कलेतला आपला दबदबा स्पष्ट केला. मुंबईत झालेल्या सोहळ्यात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते दोघांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यंदाच्या पुरस्कार यादीत कस्तुरीला कलादान युवा पुरस्कार, तर अनुरागला युवा संगीत संयोजक पुरस्कार जाहीर झाला असून एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल असे या गौरवाचे स्वरूप आहे.

दोघांचेही शालेय शिक्षण अलिबाग आरसीएफ शाळेत झाले असून त्यांनी अलिबागमध्येच शास्त्रीय गायिका शीतल कुंटे यांच्याकडे प्राथमिक तालीम घेतली आहे. कस्तुरीने निषाद बाक्रे, गौरी पाठारे आणि पं. अरुण कशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गायकी परिपूर्ण केली असून राष्ट्रीय शिष्यवृत्ती, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शिष्यवृत्ती, देवल क्लबचा जयपूर गायकी विशेष पुरस्कार, गानवर्धन संस्थेचा पं. त्र्यंबकराव जानोरीकर पुरस्कार अशा अनेक मानांकनांनी तिचा गौरव झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या एमए परीक्षेत विद्यापीठात प्रथम येण्याचा मान तिने पटकावला होता. सध्या ती भारतीय शास्त्रीय संगीतावर पीएचडी करत आहे.
मुंबई विद्यापीठाचा अभियांत्रिकी पदवीधर असलेला अनुराग गोडबोले मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात आश्वासक संगीतकार म्हणून उदयास आला आहे. ‘बॉईज फोर’, ‘पांडू’सारख्या लोकप्रिय चित्रपटांना त्याने दिलेले पार्श्वसंगीत विशेष गाजले असून अवधूत गुप्ते, वैशाली सामंत यांसारख्या नामवंत कलावंतांसाठीही तो संगीत संयोजनाचे काम करीत आहे. पं. संजीव चिंबळगी व दिग्गज संगीतकार स्व. अनिल मोहिले यांच्या मार्गदर्शनाखाली अनुरागने संगीतदिग्दर्शनातील कौशल्य अधिक विकसित केले.
अलिबागमध्येच ताल-स्वरांची बीजे रोवणाऱ्या या दोन कलाकारांच्या राज्यस्तरीय सन्मानामुळे शहरात अभिमानाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
……




