ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
मातीपासून डॉलरपर्यंत: रायगडच्या महिलांनी गणरायाला दिली जागतिक भरारी
247 महिला बचतगटांकडून 1.53 लाख गणेशमूर्ती; 2,250 मूर्तींची थेट परदेशवारी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
पेणच्या पारंपरिक गणेशमूर्ती उद्योगाला यंदा ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेची नवी ओळख मिळाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या उमेद अभियानांतर्गत 247 महिला बचतगटांनी तब्बल 1 लाख 53 हजार 541 गणेशमूर्ती साकारल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी 2,250 गणेशमूर्ती थेट परदेशात पाठविण्यात येणार असून, मातीतून घडलेली ही कला आता जागतिक बाजारपेठेत झेपावणार आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. पिढ्यान् पिढ्या जपलेल्या शिल्पकलेमुळे पेणच्या मूर्तींना भौगोलिक मानांकन (GI) प्राप्त झाले आहे. सुबक आखणी, रेखीव डोळे, आकर्षक रंगसंगती आणि पारंपरिक बैठक ही पेणच्या मूर्तींची वैशिष्ट्ये मानली जातात. या वारशात यंदा महिला बचतगटांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत उद्योगाला नवे बळ दिले आहे.
उमेद अभियानामार्फत महिलांना केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर फिरता निधी, समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे अनेक महिलांनी घरगुती कौशल्याचे रूपांतर उद्योगात केले. गणेशोत्सवाच्या हंगामात महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला असून, कुटुंबाच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात तयार झालेल्या एकूण मूर्तींपैकी 1 लाख 45 हजार 284 मूर्ती एकट्या पेण तालुक्यात तयार झाल्या आहेत. त्याशिवाय माणगाव, मुरुड, खालापूर, कर्जत, उरण, सुधागड, अलिबाग, श्रीवर्धन, रोहा, तळा, महाड आणि पनवेल या तालुक्यांतील महिला बचतगटांनीही मूर्ती निर्मितीत सहभाग घेतला आहे. यामुळे गणेशमूर्ती उद्योगाची व्याप्ती पेणपुरती मर्यादित न राहता संपूर्ण रायगडमध्ये विस्तारत असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्हा परिषदेतर्फे अधिकाधिक महिला बचतगटांनी या व्यवसायात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पारंपरिक कला, स्थानिक उद्योग आणि महिला सक्षमीकरण यांची सांगड घालत ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने स्पष्ट केले.
रायगडची गणेशमूर्ती जागतिक झेप
महिला बचतगट – 247
तयार गणेशमूर्ती – 1,53,541
परदेशात जाणाऱ्या मूर्ती – 2,250
पेण तालुक्यातील निर्मिती – 1,45,284
…….




