ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

अलिबागचे माहिती अधिकार योद्धा संजय सावंत ‘प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड’ने सन्मानित


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

रायगड : अलिबाग येथील प्रख्यात माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांना समाजकारणात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया तर्फे ‘प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले.

या सोहळ्यात फाउंडेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस धनंजय म्हात्रे यांच्या हस्ते सावंत यांना सन्मानपत्र देण्यात आले. भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्यासाठी आणि प्रशासनात पारदर्शकता प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत असलेली ही संस्था निती आयोग, MSME मंत्रालय व I.T. कायद्यांतर्गत नोंदणीकृत असून सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनद्वारे मान्यताप्राप्त आहे.

गौरव समारंभाला नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात सावंत यांचे स्वागत केले.

सावंत यांनी आपल्या कार्यातून माहिती अधिकाराच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांची सामाजिक बांधिलकी, पारदर्शकतेसाठीची जिद्द आणि कार्यतत्परता व्यापक पातळीवर गाजत असून ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

समारंभात बोलताना सावंत म्हणाले –
“माहिती अधिकार कायदा हा नागरिकांच्या हातातील एक सक्षम शस्त्र आहे. शासन-प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रत्येकाने या कायद्याचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. समाजकारण करताना प्रामाणिकपणा आणि धैर्य असेल तर कोणताही सकारात्मक बदल घडवता येतो.”

युवकांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, केवळ तक्रारी करून न थांबता समस्यांचा अभ्यास करून रचनात्मक पद्धतीने लढा दिल्यास समाजात आदर्श निर्माण करता येतो.

या सन्मानामुळे अलिबाग परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असून सावंत यांचा गौरव इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

 


Related Articles

Back to top button