ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

आईचं बळ, समाजाचं भान! खानावच्या शाळेत प्रेरणादायी स्त्री शक्ती सोहळा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग : वारसा स्त्री शक्तीचा, सन्मान सक्षम महिलांचा! या घोषवाक्याने खानाव (ता. अलिबाग) येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ८ जानेवारी २०२६ रोजी अक्षरशः भारावून गेली. एकल महिला पालकांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात शिक्षण, संस्कार आणि समाजप्रबोधन यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक रवींद्र थळे, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, दहा एकल महिला पालक, खानाव ग्रामपंचायत प्रतिनिधी, ग्रामसेविका पेढवी, शालेय महिलासमिती सदस्या पूजा वैशंपायन, तसेच अंनिस, अलिबाग शाखेचे दहा कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि देवी शारदा यांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाली. विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने वातावरणात उत्साह संचारला. त्यानंतर “राजे हो!” या गाण्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
जिद्दी मातांचा सन्मान
सुभाष पानस्कर यांनी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची महती सांगताना, पतीच्या निधनानंतरही खचून न जाता आपल्या मुलांना शिक्षण देत संसार सांभाळणाऱ्या मातांच्या संघर्षाला सलाम केला. अशा एकल महिला पालकांचा अंनिसच्या वतीने भेटवस्तू, प्रशस्तीपत्र आणि खाऊ देऊन सन्मान करण्यात आला.
अंधश्रद्धांवर प्रहार, समाजाला जागृती
सुप्रिया जेधे यांनी बुवाबाजी, फसवणूक, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी यावर प्रात्यक्षिकांसह प्रकाश टाकत मुलांना, पालकांना आणि शिक्षकांना सजग केले.
इतिहासातून प्रेरणा
प्रमुख पाहुणे व अध्यक्ष प्रा. शाम जोगळेकर यांनी महात्मा फुले दांपत्याच्या सत्यशोधक चळवळीचा उल्लेख करत, मराठीतील पहिल्या महिला संपादक तानुबाई बिर्जे यांच्या पत्रकारितेचा प्रेरणादायी इतिहास उलगडला. त्यांनी भावी पिढीसमोरील सामाजिक आणि डिजिटल धोक्यांविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संध्या कुलकर्णी, पूजा वैशंपायन आणि निर्मला फुलगावकर यांनी स्त्रियांच्या कुटुंब व समाजातील भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत, “समाजाची आई व्हा!” असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी केले. आभारप्रदर्शनानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Back to top button