विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना शासनाचा इशारा! सत्यमेव जयतेच्या वृत्ताची दखल; विदर्भातील शाळा २२ जून, उर्वरित महाराष्ट्रातील १५ जूनपासून

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई / रायगड | विशेष प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून, शासनाच्या भूमिकेची वाट न पाहता काही खासगी शाळांनी ८ जूनपासून शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय अखेर त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यभर उष्णतेची लाट कायम असताना आणि मान्सूनचे आगमन लांबल्याने पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेला सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमने आरसा दाखवला आणि अखेर शासनाला हस्तक्षेप करावा लागला.

लहान मुलांच्या जीवापेक्षा फी आणि उपस्थिती महत्त्वाची मानणाऱ्या काही खासगी शाळांनी उन्हाच्या तीव्रतेकडे पूर्णपणे कानाडोळा केला. सकाळीच तापमानाचा पारा चढत असताना, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा उद्योग सुरू होता. उष्माघात, निर्जलीकरण आणि अन्य आरोग्यधोक्यांच्या शक्यतेकडे दुर्लक्ष करून घेतलेले हे निर्णय कोणाच्या आशीर्वादाने घेतले जात होते, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
या पार्श्वभूमीवर सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमने शनिवारी हा मुद्दा ठळकपणे मांडला. वृत्त प्रसिद्ध होताच राज्यभरातून पालकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आणि प्रश्न थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही या वृत्ताची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली.
परिणामी, शासनाने ९ जून रोजी परिपत्रक जारी करत विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच २२ ते ३० जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात येतील आणि १ जुलैपासून नियमित वेळापत्रक लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले. उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १५ जूनपासून नियमित सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा स्वतःची मनमानी चालवणाऱ्या काही खासगी शाळांना आता लगाम बसणार आहे. शासनाच्या आदेशानंतरही जर कोणी शाळा व्यवस्थापन स्वतःचे नियम राबवण्याचा प्रयत्न करेल, तर त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.
या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सामान्य पालकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकारितेने केले. अनेकदा लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारी यंत्रणा जनमताचा दबाव निर्माण झाल्यानंतरच जागी होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
आज लाखो पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. हा विजय केवळ एका परिपत्रकाचा नाही, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा, पालकांच्या चिंतेचा आणि लोकहितासाठी उभ्या राहिलेल्या निर्भीड पत्रकारितेचा आहे.
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमने वेळेवर उपस्थित केलेल्या या जनहिताच्या प्रश्नामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग तसेच हा विषय सातत्याने लावून धरणाऱ्या सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही, हे सरकारच्या या निर्णयाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.




