पदोन्नती आरक्षणासह विविध प्रश्नांवर कास्ट्राईबचा कोकण आयुक्तांकडे पाठपुरावा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
नवी मुंबई |
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधींनी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. कोकण भवन येथे ६ मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने २४ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत SC व ST कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण, जुनी पेन्शन योजना लागू करणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरणे, तसेच अनुकंपा तत्वावर भरती आणि पदोन्नती या मुद्द्यांवर विशेष चर्चा करण्यात आली.
याशिवाय कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली, ३ डिसेंबर १९८० च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना कार्यकारी पदावर नियुक्ती, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाना साठी जागा उपलब्ध करून देणे, तसेच अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पदावर नियुक्ती देणे यासंदर्भातही मागण्या मांडण्यात आल्या. दुर्गम भागातील अति मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आधारकार्ड उपलब्ध करून देण्याचाही मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.
या बैठकीस कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, कार्याध्यक्ष गणेश मडावी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे सचिव शिवाजी बीबराळे, विभागीय अध्यक्ष शिक्षक संघटना गाडे, रायगड महासंघाचे संजीव मोरे, महसूल विभागाचे रायगड जिल्हाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप कदम तसेच ठाणे जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी विजय जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.




