ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची रायगडातून सुरुवात; मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पळस्पे येथे शुभारंभ

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : गावांचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची घोषणा केली असून या अभियानाचा शुभारंभ रायगड जिल्ह्यातील पळस्पे ग्रामपंचायतीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. हे अभियान दि.17 सप्टेंबर ते दि.31 डिसेंबर 2025 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, महिला बचत गटाच्या सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत. ग्रामपंचायतींना विकासकामांमध्ये स्पर्धा करण्याची संधी देत राज्य शासनाने लाखो रुपयांच्या पारितोषिकांची घोषणा केली आहे.”

प्रथम क्रमांकासाठी 15 लाख, द्वितीय क्रमांकासाठी 12 लाख, तर तृतीय क्रमांकासाठी 8 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरही स्वतंत्र बक्षिसे दिली जाणार आहेत. या अभियानाचे उद्दिष्ट सक्षम व सुशासनयुक्त पंचायत उभारणे, जलसमृद्धी, स्वच्छ व हरित गाव निर्मिती, सरकारी योजनांचा प्रभावी अंमल, लोकसहभाग वाढविणे तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे आहे.
राज्यस्तरीय पुरस्कार वितरणावेळी रायगड जिल्ह्यातील किमान तीन ग्रामपंचायतींनी पारितोषिक मिळवावे, अशी अपेक्षा मंत्री तटकरे यांनी व्यक्त केली. पळस्पे ग्रामपंचायतीने राज्यातील पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळवावे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय शुभारंभ संपन्न झाला. त्याचा थेट प्रक्षेपण पळस्पे येथे दाखवण्यात आला. यावेळी मंत्री तटकरे यांनी बचतगटांच्या उपक्रमांच्या स्टॉलना भेट देऊन कौतुक केले.




