ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’; बाप्पाच्या चरणी गोगावले, की जुन्या राजकीय विरोधालाच लोटांगण?

अनिकेत तटकरेंच्या आमदारकीपासून पालकमंत्रीपदापर्यंतची समीकरणे; तटकरे यांच्या घरी गोगावले यांच्या भेटीने नव्या राजकीय अध्यायाची चर्चा


फडशा 
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
आविष्कार देसाई 
‘घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे…’ गणरायाच्या चरणी म्हटल्या जाणाऱ्या या ओळी. पण रायगडच्या राजकारणात भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर याच ओळींना राजकीय उपरोधाची किनार मिळाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सुनील तटकरे हे नाव केवळ एक नेता म्हणून नव्हे, तर राजकीय पटावरची चाल ओळखणारा धुरंधर आणि वेळ साधून डाव फिरवणारा मुसद्दी म्हणून घेतले जाते. त्यांची खासियत एवढीच नाही की ते स्वतःची चाल खेळतात; तर कधी कधी त्यांच्या एका चालीने समोरच्यालाच आपली पुढची चाल बदलावी लागते. राजकीय संघर्ष कितीही टोकाचा असो, समीकरणे कितीही ताणलेली असोत वेळ, प्रसंग आणि राजकीय गरज बदलली की पटही बदलतो आणि भूमिका देखील. कालपर्यंत ताठ उभा असलेला विरोध आज नम्र होतो, कालचा दावेदार आज सहकार्याचा सूर लावतो आणि काल ज्यांच्याशी दोन हात करण्याची भाषा होती, त्यांच्याच दारी आज सदिच्छेची पावले पडतात. म्हणूनच गोगावले यांची तटकरे यांच्या घरी झालेली बाप्पाच्या दर्शनाची भेट पाहताना आरतीतील ओळी सहज आठवतात ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण…’ बाप्पाच्या चरणी माथा टेकणे हा श्रद्धेचा भाग; पण तटकरेंच्या राजकीय पटावर अशी कोणती चाल पडली की जुन्या विरोधालाच आता लोटांगण घालावे लागले? रायगडच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा हा प्रश्नच या भेटीला वेगळी धार देतो.
एकेकाळी रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच रंगला होता. पालकमंत्रीपदावरून दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने खटके उडत होते. तटकरेंचा दावा आणि गोगावले यांची दावेदारी यामुळे रायगडच्या राजकारणात संघर्षाची धार कायम होती.
मात्र पुढे राजकीय समीकरणांनी अशी कलाटणी घेतली की, अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यानंतर पालकमंत्रीपदाचा प्रश्नही वेगळ्या वळणावर गेला. स्वतः भरत गोगावले यांनीच जाहीरपणे सांगितले आहे की, अनिकेत तटकरे यांना आमदारकीची वाट मोकळी करून दिल्यामुळेच अखेर पालकमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. म्हणजेच कालच्या संघर्षाच्या कथेत अनिकेत तटकरे यांच्या आमदारकीचा अध्याय हा पुढच्या राजकीय समीकरणातील महत्त्वाचा दुवा ठरला.
आणि आता गणेशोत्सवात गोगावले थेट तटकरे यांच्या घरी! बाप्पाचे दर्शन झाले, आरती झाली, आशीर्वाद घेतले प्रसाद घेतला; पण राजकीय निरीक्षकांच्या नजरेत मात्र प्रश्न वेगळाच आहे. ज्यांच्याशी पालकमंत्रीपदावरून संघर्ष झाला, त्यांच्याच घरी आज गणरायाच्या चरणी माथा टेकताना दिसणे म्हणजे जुन्या राजकीय भूमिकेलाच लोटांगण घालणे आहे का?
इथेच ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’ या ओळींचा उपरोध अधिक चपखल ठरतो. कारण लोटांगण म्हणजे केवळ शरीराने नतमस्तक होणे नाही; राजकारणाच्या भाषेत त्याचा अर्थ जुन्या हट्टापासून माघार, संघर्षाला पूर्णविराम आणि बदललेल्या समीकरणांसमोर नतमस्तक होणे असाही काढता येतो.
बाप्पाच्या चरणी गोगावले यांचे मस्तक झुकले, हे भक्तीचे दृश्य; पण तटकरेंविरोधातील राजकीय भूमिका झुकली असेल, तर ते बदललेल्या राजकीय समीकरणांचे दृश्य! अनिकेत तटकरेंना आमदारकीची वाट मोकळी करून देण्यापासून ते स्वतःच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर तटकरे यांच्या घरी बाप्पाचे दर्शन या घटनांची राजकीय सांगड घातली तर रायगडच्या राजकारणात ‘लोटांगण’ या शब्दाचा उपरोध अधिकच बोलका ठरतो.
शेवटी भेट गणरायाच्या दर्शनासाठीच होती, असे दोन्ही बाजूंकडून सांगितले जाऊ शकते. पण राजकारणात भेटींची वेळ, ठिकाण आणि पार्श्वभूमीही बोलत असते. त्यामुळे प्रश्न एवढाच गोगावले बाप्पाच्या चरणी लोटांगण घालून उठले, की तटकरेंशी नव्या राजकीय समीकरणासमोर नतमस्तक होऊन?
दरम्यान, आता खरा प्रश्न गोगावले आणि तटकरे यांच्यातील राजकीय समीकरणे बदलली असतील, तर दळवी-थोरवेंची पुढची भूमिका काय असणार? आजवर तटकरेंविरोधात ठामपणे मांडलेली भूमिका उद्या बदलणार का? बदलली तर मतदार त्याकडे राजकीय शहाणपण म्हणून पाहतील की भूमिकेतील बदल म्हणून? आणि गोगावलेनंतर दळवी-थोरवेंनाही तटकरेंच्या नव्या राजकीय समीकरणात सामावून घेणे ही पुढची चाल असेल, तर तटकरेंच्या राजकीय पटावर पुढचा मोहरा कोणता हा प्रश्न रायगडच्या राजकारणात उत्सुकता निर्माण करणारा ठरतो.
……

Related Articles

Back to top button