ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

ग्राहकांसाठी संवेदनशील, शेतकऱ्यांसाठी आधार; RBIला भावला रायगड बँकेचा ‘सहकारी’ चेहरा!

ग्राहक सेवा, सामाजिक बांधिलकी आणि कृषी कर्जपुरवठ्यातील योगदानाची RBIकडून दखल; इतर बँकांसाठी कार्यपद्धती आदर्श असल्याचे गौरवोद्गार


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग |

ग्राहक सेवा, सामाजिक बांधिलकी आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या भूमिकेमुळे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी विशेष दखल घेतली. पेण येथे RBIच्या वतीने आयोजित बँकिंग सुविधा, आर्थिक साक्षरता आणि विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासंदर्भातील कार्यक्रमात रायगड जिल्हा बँकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यात आले.

रिझर्व्ह बँकेचे मुंबई येथील प्रादेशिक संचालक राकेश कुमार श्रीवास्तव आणि उपमहाव्यवस्थापक डॉ. ज्योती सक्सेना यांनी रायगड जिल्ह्यातील बँकिंग सेवांचा आढावा घेताना जिल्हा बँकेच्या कामाची विशेष नोंद घेतली. ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देतानाच नियमांचे पालन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका जपणारी बँक म्हणून जिल्हा बँकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यात आले.

डॉ. ज्योती सक्सेना यांनी आपल्या भाषणात ग्राहक सेवा आणि नियमपालनाकडे केवळ व्यावसायिक जबाबदारी म्हणून न पाहता सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून काम करण्याची रायगड जिल्हा बँकेची भूमिका अधोरेखित केली. ग्राहकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा दृष्टिकोन इतर बँकांसाठी आदर्श ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

दुसरीकडे, रायगडच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असलेल्या कृषी क्षेत्रात जिल्हा बँकेच्या योगदानाचीही यावेळी दखल घेण्यात आली. रायगड जिल्ह्यात कृषी कर्जपुरवठ्यात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले महत्त्वाचे स्थान कायम राखत असल्याचे रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक संचालक राकेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. कृषी क्षेत्राला आर्थिक पाठबळ देण्यात जिल्हा बँकेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात आर्थिक साक्षरता वाढविणे, नागरिकांना बँकिंग सेवांशी जोडणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या गरजेवरही भर देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या ग्राहकाभिमुख आणि ग्रामीण भागाशी जोडलेल्या कार्यपद्धतीला मिळालेली दाद महत्त्वाची मानली जात आहे.

कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक तथा राज्यस्तरीय बँकर्स समितीचे निमंत्रक विवेक नाचणे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक धनंजय सिंह राठौर, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक बिचेंद्र चरण मल्लिक आणि बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील शर्मा यांच्यासह विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील विविध सरकारी, खासगी आणि सहकारी बँकांचे प्रतिनिधी, प्रादेशिक प्रमुख तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक यांसह प्रमुख बँकांच्या अधिकाऱ्यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विवेक नाचणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक संचालक राकेश कुमार श्रीवास्तव यांनी उद्घाटनपर भाषण केले. यावेळी रायगड जिल्हा बँकेच्या सुनिता पाटील यांच्यासह विविध लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले.

ग्राहक सेवा आणि सामाजिक बांधिलकीसोबतच कृषी कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी सहकारी बँक म्हणून रायगड जिल्हा बँकेच्या भूमिकेला RBIच्या व्यासपीठावरून मिळालेली ही दखल महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे ‘ग्राहकांसाठी संवेदनशील आणि शेतकऱ्यांसाठी आधार’ ही जिल्हा बँकेची ओळख अधिक अधोरेखित झाली आहे.


Related Articles

Back to top button