वडिलांच्या कष्टांची बॅटिंग, मुलीच्या स्वप्नांची BCCIच्या मैदानावर इनिंग; रोशनी पारधीची वुमन्स चॅलेंजर्स स्पर्धेसाठी निवड
महाडच्या मातीतून राष्ट्रीय क्रिकेटच्या दिशेने प्रवास; रोशनीच्या यशाने रायगडच्या महिला क्रिकेटला नवी ओळख

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
महाड |
रायगडच्या क्रिकेटविश्वासाठी अभिमानाची बातमी आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि एसबीसी क्रिकेट अकॅडमी, महाडची गुणवान अष्टपैलू क्रिकेटपटू कु. रोशनी रविंद्र पारधी हिची बीसीसीआय आयोजित १९ वर्षांखालील वुमन्स चॅलेंजर्स टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून या स्पर्धेसाठी निवड झालेल्या चार खेळाडूंमध्ये रोशनीसह भाविका अहिरे, ईश्वरी आस्वारे आणि ग्रीशा कटारिया यांचा समावेश आहे.
सामान्य कुटुंबातून आलेल्या रोशनीच्या या यशामागे तिच्या मेहनतीसोबत वडील रविंद्र पारधी यांचा मोठा संघर्ष आहे. आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी मुलीच्या क्रिकेटच्या स्वप्नाला खंबीर पाठिंबा दिला. त्यामुळे BCCIच्या मैदानावर उतरणाऱ्या रोशनीच्या इनिंगमध्ये तिच्या वडिलांच्या कष्टांचाही मोठा वाटा आहे.
महाडच्या मातीतून राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेपर्यंत पोहोचलेली रोशनी ही रायगडच्या महिला क्रिकेटसाठी नवी ओळख ठरली आहे. योग्य प्रशिक्षण, सुविधा आणि पाठबळ मिळाल्यास रायगडमधील आणखी अनेक मुली राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर झेप घेऊ शकतात, याचे रोशनी हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
रोशनीची निवड होताच रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सदस्य अॅड. पंकज पंडित, प्रदीप खलाटे, संदीप जोशी तसेच प्रशिक्षक आवेश चिचकर आणि बशीर चिचकर यांनी महाड येथील तिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. यावेळी रोशनीसह तिच्या पालकांचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
अनिरुद्ध पाटील यांनी रोशनीने अत्यंत कमी वयात मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्राच्या महिला क्रिकेटमध्ये स्थान मिळवल्याचे सांगत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भविष्यात रोशनीची कामगिरी उंचावत जाऊन तिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड व्हावी, अशी संपूर्ण रायगडवासीयांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रोशनीच्या पुढील वाटचालीसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनसह सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि क्रीडाप्रेमींनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
आता BCCIच्या वुमन्स चॅलेंजर्सच्या मैदानावर रोशनीची नवी इनिंग सुरू होणार असून, महाडच्या या लेकीची पुढची झेप भारतीय संघापर्यंत जाते का, याकडे रायगडसह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




