ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

टपाल सेवेत सुधारणा आणि योजनांचा प्रसार; फोरम सभेत सकारात्मक चर्चा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग  |

केंद्र शासनाच्या पोस्ट विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध बचत व विमा योजनांचा अधिक प्रभावी प्रसार करण्यासह टपाल सेवेत सुधारणा करण्यावर भर देत सिटीझन चार्टर पोस्टल फोरमची त्रैमासिक सभा अलिबाग येथील मुख्य पोस्ट कार्यालयात उत्साहात पार पडली.
पोस्ट खाते हे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले महत्त्वाचे दळणवळण माध्यम असून, त्यामार्फत संपूर्ण जीवन विमा, सुकन्या समृद्धी, मासिक प्राप्ती योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, ग्रामसुरक्षा, ग्रामसुमंगल, ग्रामप्रिया आदी अनेक लोकोपयोगी योजना नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. या योजनांचा तळागाळापर्यंत अधिक प्रभावी प्रसार व्हावा, यासाठी फोरमच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे सभेत अधोरेखित करण्यात आले.
या सभेत टपाल वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. पोस्टपेट्यांची नियमित देखभाल, पत्रांचे वेळेवर वितरण तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या टपालावर स्पष्ट शिक्के मारणे यांसारख्या मुद्द्यांवर विशेष लक्ष देण्याचे ठरविण्यात आले.
तसेच ग्रामीण डाक जीवन विमा, ग्रामसुमंगल (मनीबॅक), ग्रामप्रिया, मासिक प्राप्ती योजना व ज्येष्ठ नागरिक बचत योजना याबाबत अधिक व्यापक जनजागृती करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. नागरिकांना या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी पोस्ट विभागाने विविध उपक्रम राबविण्याचे संकेत देण्यात आले.
सभेच्या प्रारंभी मागील बैठकीचे इतिवृत्त मुख्य पोस्टमास्तर सौ. निलीमा पाटील यांनी वाचून दाखवले. तसेच मागील सभेत उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आले.
या बैठकीस रायगड पोस्ट विभागाचे अधीक्षक सुनील थळकर, मुख्य पोस्टमास्तर निलीमा पाटील, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, निवृत्त प्राध्यापक श्याम जोगळेकर, निवृत्त मुख्याध्यापक राम शिंदे तसेच सदस्य प्रकाश पाटील, मिलिंद पाटील, महेंद्र हुमणे आणि अनिल दाभेकर उपस्थित होते.
सभेचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.


Related Articles

Back to top button