“देशभक्तीची अखंड मशाल – मनोज सानपांचा ५,००० वा ऐतिहासिक प्रयोग”
"शौर्य, त्याग आणि मातृभूमीवरील निष्ठेचा संदेश पसरवणाऱ्या ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ या एकपात्री नाटिकेचा अभिमानास्पद टप्पा"

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
ठाणे : देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या स्मृती जागवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. गेली जवळपास तीन दशके ही जबाबदारी जपणारे ठाणे जिल्ह्याचे माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी “शहीद कॅप्टन विनायक गोरे” या एकपात्री नाटिकेद्वारे देशभक्तीची ज्योत अखंड पेटती ठेवली आहे. या नाटिकेचा ५,००० वा प्रयोग १३ सप्टेंबर रोजी सोमय्या महाविद्यालयात रंगणार असून, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

१९९५ साली जम्मू-काश्मीर सीमेवर शत्रूंशी झुंज देत कॅप्टन विनायक गोरे यांनी बलिदान दिले. त्यांची आठवण कायम ठेवण्यासाठी आणि तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी त्याच वर्षी एनसीसी कॅडेट असलेले मनोज सानप यांनी या नाटिकेचा प्रारंभ केला. केवळ १५ मिनिटांची ही नाटिका प्रत्येक वेळी अंगावर रोमांच उभा करते, प्रेक्षकांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू आणते आणि मातृभूमीबद्दलची निष्ठा दृढ करते.

या प्रवासात हजारो युवक प्रेरित झाले, अनेकांनी सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी रक्तदान, अवयवदान, सैनिकांच्या कुटुंबांचा सन्मान आणि समाजोपयोगी उपक्रमांचा ध्यास घेतला. व्यक्तिगत लाभाची अपेक्षा न ठेवता मनोज सानप यांनी राष्ट्रभक्तीला जीवनधर्म मानून या कार्याला वाहून घेतले.

सोमय्या कॉलेजच्या फाउंडेशन डे निमित्त होत असलेला ५,००० वा प्रयोग म्हणजे केवळ नाट्यप्रयोग नाही; तर तो शहीद जवानांच्या त्यागाला वाहिलेली आदरांजली, एका कलाकाराच्या अथक जिद्दीचा पुरावा आणि समाजाला योग्य दिशा देणाऱ्या प्रेरणादायी प्रवासाचे प्रतीक आहे.

या प्रसंगी उपस्थितांच्या टाळ्यांचा गजर, डोळ्यांत तरळणारे कृतज्ञतेचे अश्रू आणि मनात उमटणारी एकच भावना –
“शहीदांना वंदन, आणि त्यांच्या स्मृती जिवंत ठेवणाऱ्या मनोज सानपांना सलाम!”




