ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
“जीएसटी कौन्सिलच गिफ्ट : विमा फ्री, करकपातीतून स्वस्त होणार रोजच्या वस्तू”
"शेतकऱ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना दिलासा : जीएसटी कौन्सिलचे महत्वाचे निर्णय" महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५६व्या बैठकीत जनतेच्या हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्राच्या वतीने या बैठकीत प्रतिनिधित्व करण्यात आले असून, महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांचीही उपस्थिती होती.

बैठकीत ‘सर्वांसाठी विमा’ या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी सर्व वैयक्तिक आरोग्य व जीवनविमा सेवा करमुक्त करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. अन्नधान्य व आरोग्याशी संबंधित वस्तूंवरील करदर कमी करून कर वर्गीकरण सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय, टीव्ही, एअर कंडिशनर यांसारख्या ‘व्हाईट गुड्स’वरील कर १८% करण्यात आले. साबण, डिटर्जंट, टूथपेस्ट, पादत्राणे, कपडे व सौंदर्यप्रसाधने यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील करदर कमी करण्यात आले आहेत. खत निर्मितीतील नायट्रस अॅसिड, अमोनिया, तसेच वस्त्रोद्योगातील सूत व चामड्यावरील करदेखील कमी झाले आहेत.

पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी सिमेंटवरील कर २८% वरून १८% करण्यात आला. लहान प्रवासी व मालवाहतूक वाहनांवरील करदरही १८% करण्यात आला असून याचा महाराष्ट्रातील वाहनउद्योग व निर्यात क्षेत्राला फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी विशेष दिलासा देत ट्रॅक्टरवरील कर १८% वरून ५% करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जैविक कीटकनाशके, खते, सिंचन साधने व शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीवरील कर ५% करण्यात आले आहेत. सर्व औषधांवर केवळ ५% कर आकारला जाणार असून काही जीवनावश्यक औषधे करमुक्त करण्यात आली आहेत.

या निर्णयांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल व देशाच्या प्रगतीला गती मिळेल, असे महाराष्ट्राच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.




