ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
अलिबाग नगरपालिकेत विरोधकांचा शपथविधी; भाजपा व शिवसेना (युबीटी) नगरसेवकांनी पदभार स्वीकारला

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आज राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपाचे अंकित बंगेरा तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या श्वेता पालकर आणि संदीप पालकर या पती-पत्नीने अलिबाग नगर परिषदेत नगरसेवक पदाचा अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला.
अलिबाग नगर परिषदेची निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडली होती. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाले. या निकालात शेकापक्षाने १७ जागांवर वर्चस्व मिळवले असले, तरी काही प्रभागांमध्ये विरोधकांनी अत्यंत कडव्या संघर्षानंतर विजय संपादन करत आपली उपस्थिती ठसठशीतपणे नोंदवली.
या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला २ तर भाजपाला १ जागा मिळाली. या तिन्ही जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी आज अलिबाग नगरपालिकेत अधिकृतपणे नगरसेवक पदाचा पदभार स्वीकारला. या प्रसंगी शिवसेना ( युबीटी) व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकारताना समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
शेकापक्षाचे संख्याबळ जास्त असले, तरी विरोधकांचा हा विजय आगामी काळात नगरपालिकेतील चर्चांना आणि निर्णय प्रक्रियेला वेगळी दिशा देणारा ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जनहिताचे प्रश्न, विकासकामे तसेच प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधकांची भूमिका अधिक आक्रमक राहील, असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.
“अलिबागच्या विकासासाठी पारदर्शक कारभार, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि नागरिक-केंद्रित निर्णय हे आमचे प्राधान्य असेल. मूलभूत सोयी, स्वच्छता, वाहतूक आणि पर्यटनविकास यांचा समतोल साधत शहराला आधुनिक आणि सुबक स्वरूप देण्यासाठी सकारात्मक व बांधील भूमिका निभावू.”, असे एडवोकेट अंकित बंगेरा यांनी स्पष्ट केले.
“अलिबागच्या विकासात महिलांचे प्रश्न, सुरक्षितता, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा यांना विशेष प्राधान्य दिले जाईल. शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित करण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”, असे श्वेता पालकांनी सांगितले.
“अलिबाग शहराचा विकास करताना सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवले जातील. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे यावर भर देत सातत्यपूर्ण आणि लोकाभिमुख विकासासाठी आम्ही सकारात्मक भूमिका बजावू.”, असे संदीप पालकर यांनी सांगितले.
आगामी नगरपालिकेच्या सभांमध्ये विरोधकांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता असून, अलिबागच्या राजकारणात नवे समीकरण आकाराला येण्याचे संकेत मिळत आहेत.



